यात्राकाळात जादाच्या 60 बस धावणार : प्रवाशांची गैरसोय दूर करण्याला प्राधान्य
प्रतिनिधी /बेळगाव
शाकंभरी पौर्णिमेसाठी सौंदत्ती यल्लम्मा यात्रेला जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहनने बेळगाव-सौंदत्ती मार्गावर अतिरिक्त बससेवा सुरू केली आहे. यात्राकाळात या मार्गावर जादाच्या 60 बस धावणार आहेत. रविवारपासून ही बससेवा सुरू केली आहे. पहिल्या दिवशी 3 बस मध्यवर्ती बसस्थानकातून सौंदत्तीकडे धावल्या.
कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यांतून लाखो भाविक सौंदत्ती यल्लम्मा यात्रेला जात आहेत. दरम्यान, परिवहनने या मार्गावर जादा बसचे नियोजन केल्यामुळे प्रवाशांचा प्रवास सोयीस्कर होणार आहे.
मध्यवर्ती बसस्थानकातून सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत ही विशेष बससेवा उपलब्ध होणार आहे. सौंदत्ती यात्रेसाठी बेळगाव, खानापूर, चंदगड, गडहिंग्लज, हुक्केरी आदी तालुक्यातून जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. यासाठी जादा बसची व्यवस्था केली आहे.
शिवाय भक्तांना बस बुकिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय ksrtc.karnataka.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन बुकिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच प्ले-स्टोअरमधून परिवहन अॅप डाऊनलोड करूनदेखील ऑनलाईन बुकिंग करता येते.
सौंदत्ती यल्लम्मा यात्रेसाठी बसस्थानकातून अतिरिक्त बससेवा सुरू करण्यात आली आहे. काही बस विनाथांबा सोडल्या जाणार आहेत. प्रवाशांच्या संख्येनुसार बसफेऱ्या वाढविल्या जाणार आहेत. बुधवारी, गुरुवारी आणि शुक्रवारी जादा बस सोडल्या जाणार आहेत.
– के. के. लमाणी, विभागीय संचार अधिकारी









