नवरात्रोत्सव काळात बेळगाव-सौंदत्ती मार्गावर धावणार 90 बस
बेळगाव : सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीच्या भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी नवरात्रोत्सव काळात बेळगाव-सौंदत्ती मार्गावर अतिरिक्त 90 बसेस धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील यल्लम्मा यात्रेसाठी नवरात्रोत्सवात जाणाऱ्या भक्तांची संख्या अधिक असते. यासाठी परिवहनने या मार्गावर जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बेळगाव-सौंदत्ती मार्गावर 14 ते 22 ऑक्टोबर दरम्यान बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकातून नॉनस्टॉप जादा बसेस धावणार आहेत. नवरात्रोत्सवासाठी बाहेरून 30 बसेस मागविण्यात आल्या आहेत. तर बसस्थानकातील 60 बसेस धावणार आहेत. एकूण 90 हून अधिक बसेसची व्यवस्था केली आहे. बेळगाव, खानापूर, चंदगड, हुक्केरी आदी ठिकाणाहून सौंदत्तीला जाणाऱ्या भक्तांची संख्या मोठी आहे. सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत बससेवा उपलब्ध राहणार आहे. शिवाय बसस्थानकात ऑनलाईन तिकीट बुकिंगची व्यवस्था केली आहे.
22 ऑक्टोबरपर्यंत बससेवा
सौंदत्ती यल्लम्मा यात्रेसाठी 90 बसेसची व्यवस्था केली आहे. बाहेरून 30 बसेस मागविण्यात आल्या आहेत. बेळगाव-सौंदत्ती मार्गावर ही विशेष बससेवा 22 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. बसस्थानकातून सकाळी 6 पासून रात्री उशिरापर्यंत बसेस धावणार आहेत.
– ए. वाय. शिरगुप्पीकर (डेपो मॅनेजर)









