ओsडिशा राज्यात सर्पदंशाचे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे. दरवर्षी सर्पदंशामुळे या राज्यात सुमारे 1 हजार लोकांना प्राण गमवावे लागतात. वादळ आणि पूर या नैसर्गिक आपत्तीला राज्याला नेहमीच सामोरे जावे लागते. त्यात आता सर्पदंश ही देखील आपत्ती बनली आहे. राज्य सरकारने ‘स्नेकबाईट’ ही राज्य विशिष्ट आपत्ती असल्याचे घोषित केले आहे. सर्पदंशाने मृत्यू झाल्यास मृताच्या कुटुंबियांना चार लाखाची मदत दिली जाते.
2015 ते 2021 मध्ये राज्यातील 30 जिल्हय़ांमध्ये सर्पदंशाने मृत्यू झालेल्यांची संख्या 5 हजार 964 एवढी नोंदविली गेली आहे. 2015-16 मध्ये सर्पदंशाने मृत्यूचे प्रमाण 446 होते. 2016-17 मध्ये 574 आणि 2017-18 मध्ये ही संख्या 824 वर गेली. या तीन वर्षात बळींची संख्या 1844 एवढी आहे. तर 2020-21 मध्ये 775 जणांचा मृत्यू झाला. या संख्येचा विचार करता ओडिशामध्ये पूर, वादळ यासारख्या आपत्तीत होणाऱया मनुष्यहानीपेक्षा हे प्रमाण अधिक आहे. सर्पदंशाचे सर्वाधिक मृत्यू हे मे ते ऑक्टोबर या कालावधीतील आहेत.
पूर, दुष्काळ, आग, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, वीज, उष्णतेची लाट, अतिवृष्टी अशा अनेक संकटांना गेली काही वर्षे ओडिशाला सामोरे जावे लागत आहे. यात हजारो लोकांना प्राण गमवावा लागला. तर सार्वजनिक आणि खासगी मालमत्तांचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. मात्र, गेल्या काही वर्षातील आकडेवारी पाहिली तर स्नेकबाईट हीदेखील ओडिशासाठी आपत्ती बनल्याचे चित्र आहे.

पूर ही वारंवारची आपत्ती
ओडिशासाठी पूर ही वारंवार येणारी आपत्ती आहे. कारण येथे पावसाचे प्रमाण अधिक आहे. वार्षिक पावसापैकी 80 टक्के पाऊस तीन महिन्यात होतो. येथे किनारी मैदाने सपाट आहेत. तर अंतर्भागातील उतार हे तीव्र आहेत. त्यामुळे पूर आला तर पाण्याचा विसर्ग कमी प्रमाणात होतो. त्यामुळे बंधारे धोकादायक बनतात. महानदी, ब्राह्मणी आणि वैतरणी या तीन नद्यांमुळे राज्याला मोठय़ा हानीला सामोरे जावे लागते. पुराचे पाणी नदीत जाऊन पुन्हा उफाळते आणि त्यामुळे पूरस्थिती उद्भवते. संपूर्ण किनारपट्टी भागाला पावसाळी हंगामात वादळाच्या लाटेचा तडाखा बसतो. पूरक्षेत्रात राहणाऱया बहुसंख्य लोकांची आर्थिक स्थिती बेताचीच आहे. स्थानिक अर्थव्यवस्था मुख्यतः पावसाळय़ात होणाऱया भातशेतीवरच अवलंबून आहे.

पारंपरिक उपायांकडे कल
ओडिशातील सर्पदंशाच्या सर्वाधिक मृत्यूची अनेक कारणे आहेत. ग्रामीण आणि शेतीप्रधान प्रदेश हे एकमेव कारण यामागे नाही. तर जलद रुग्णवाहिका सेवा आणि उपचारासाठी आवश्यक ‘गोल्डन पिरीयड’चा अभाव यामुळे मृत्यूदर वाढत आहे. त्याचबरोबर सर्पदंश झाल्यावर विष उतरविण्यासाठी पारंपरिक उपायांवर स्थानिकांचा विश्वास अजूनही आहे. त्यामुळे रुग्णाला वेळेत योग्य उपचार मिळत नाहीत.

बऱयाच घटना रात्रीच्यावेळी
भारतात सर्पदंशाने दरवर्षी सुमारे 46 हजार मृत्यू होतात. अनेकदा साप चावल्याचे कळून येत नाही. त्यामुळे वेळेत उपचार न झाल्याने मृत्यू ओढवतो. साप चावण्याच्या घटना बऱयाचदा रात्रीच्या वेळी घडतात. ग्रामीण भाग असल्याने उपचारावर, रुग्णाच्या वाहतुकीवर निर्बंध येतात. अलीकडच्या काळात किटकनाशकांच्या वापरामुळे आणि जंगलतोडीमुळे सापांचे प्रमाण कमी होत आहे.
कोब्राचा दंश
तज्ञांच्या माहितीनुसार कोब्राने केलेल्या एका दंशात 15 ते 20 जणांचा मृत्यू होईल, इतके विषाचे प्रमाण असते. मृत्यूसाठी 13 मिलीग्रॅम विष पुरेसे होते. या गणितानुसार कोब्रा सरासरी वजनाच्या माणसाला 12 ते 20 वेळा दंश करू शकतो. कोब्रा चावल्यानंतर एका तासात रुग्ण उपचारासाठी पोहोचू न शकल्याने मृत्यू ओढवतो. मात्र, कोब्रा दंशाचे प्रमाण कमी आहे. कोब्रापेक्षा मण्यार दंशाचे प्रमाण अधिक आहे.
पारंपरिक उपचारांकडे कल
सर्पदंशावरील उपचारात वेळ हा घटक अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. मात्र, स्थानिक लोकांचा पारंपरिक उपचार करण्याकडे कल दिसून येतो. वैद्याकडे नेण्यात वेळ निघून जातो. ग्रामीण भागातील लोक महादेवाच्या मंदिरात रुग्णाला नेतात. तेथे रुग्णाच्या मस्तकावर पाणी सोडले जाते. प्रार्थना करणाऱयाला बोलावले जाते. अनेकदा प्राथमिक उपचारांची आणि काळजी घेण्याची माहिती नसते. शरीराची हालचाल केल्यामुळे विष संपूर्ण शरीरात भिनते.
उपायांसंदर्भात मार्गदर्शक तत्वे
जागतिक आरोग्य संघटनेने सर्पदंशासंदर्भात काही मार्गदर्शक तत्वे दिली आहेत. भारत आणि पाकिस्तानसारख्या सर्पदंशाचे प्रमाण अधिक असणाऱया देशांनीही सर्पदंशावरील उपायांसंदर्भात मार्गदर्शक तत्वे आखून दिली आहेत. त्यात प्रथमोपचार आणि क्लिनिकल उपचारांचा समावेश आहे. सर्पदंश झाल्यावर रुग्णाची कमीत कमी हालचाल हा देखील महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केला जातो.
रुग्णवाहिका सेवा
अन्य राज्यांप्रमाणेच ओडिशातही इमर्जन्सी सेवेसाठी 108 रुग्णवाहिका सेवा उपलब्ध आहे. इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसमध्ये नेहमीच ‘गोल्डन हॉवर’ किंवा प्लॅटिनम टेम मिनिट्स’ला महत्व आहे. वेळेत रुग्णाला उपचार मिळाल्यास त्याचा जीव वाचू शकतो. ओडिशा सरकारने एखाद्या आपत्कालीन स्थितीत रुग्णाला जवळील रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी उपचार होण्याच्या दृष्टीने सर्वसमावेश रुग्णवाहिका सेवा उपलब्ध केली आहे. 104 हेल्पलाईन आणि 108 रुग्णवाहिका सेवा सर्पदंशाच्या रुग्णांच्या मदतीसाठी तत्पर करण्यात आली आहे.
जनजागृतीची गरज
ओडिशातील ग्रामीण भागातील लोक सर्पदंशाला बळी पडतात. यामागे गावठी/पारंपरिक उपचार पद्धतीचा अवलंब, रुग्णाला वेळेत रुग्णालयात न नेणे आदी कारणांचा समावेश आहे. यादृष्टीने लोकांमध्ये जनजागृतीची अधिक गरज बनली आहे. यासाठी ग्रामसभा, सामाजिक संस्था यामधून जनजागृतीची करणे आवश्यक बनले आहे.

वीज पडून मृत्यूचे प्रमाणही अधिक
ओडिशा राज्य आपत्ती व्यवस्थापन ऑथॉरिटीच्या माहितीनुसार राज्यात मान्सून काळात वीज पडून मृत्यू होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. 2006-07 ते 2017-18 मधील उपलब्ध आकडेवारीनुसार या काळात तब्बल 3 हजार 548 जणांचा वीज पडून मृत्यू झाला. पुराने 569 जणांचा बळी घेतला. आगीत 402 जणांचा मृत्यू झाला. उष्णतेच्या लाटेने 598 जणांचा बळी गेला. तर 2015-16 ते 2017-18 या काळात पाण्यात बुडून 1 हजार 429 जणांनी प्राण गमावला.
‘काल बैसाखी’ची आपत्ती
मान्सूनपूर्व काळात एप्रिल, मे ते जूनमध्ये पूर्व भारतात ‘काल बैसाखी’मुळे आपत्ती ओढवते. वादळी वारे, पाऊस आणि वीज पडण्याच्या घटनांमुळे हाहाकार उडतो. ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार, छत्तीसगढ, झारखंड आणि आसाम राज्यांना या वादळी स्थितीचा तडाखा बसतो.
सर्पदंशाने मृत्यू
2015-16 – 520
2016-17 – 574
2017-18 – 696
2018-19 – 811
2019-20 –
2020-21 – 1,107
2021-22 – 775
वादळे आणि अतिवृष्टी नेहमीचीच
ओडिशा राज्यावर वादळे आणि अतिवृष्टी, पुराचे संकट कायमच असते. उपलब्ध आकडेवारीनुसार आतापर्यंत शेकडे वादळांचा सामना या राज्याने केला आहे. अलडकडच्या आठ वर्षात फैलीन (2013), हुडहुड (2014), तितली (2018), फनी (2019), बुलबुल (2019), ऍम्फन (2020), यास (2021) आणि गुलाब (2021) अशा वादळांचे संकट ओडिशावर आले. यात मान्सूनपूर्व म्हणजे एप्रिल, मे, जून तर मान्सूननंतरच्या ऑक्टा;बर ते डिसेंबरपर्यंतच्या वादळांचा समावेश आहे.
(संदर्भ ः ओडिशा आपत्ती व्यवस्थापन आराखडा)
संकलन ः राजेश मोंडकर, सावंतवाडी









