दिल्लीपर्यंतचा प्रवास झाला सुखकर
प्रतिनिधी/ बेळगाव
वास्को-निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेसला एलएचबी कोच लावण्यात आल्याने बेळगाव-दिल्ली रेल्वे प्रवास सुखकर होत आहे. एलएचबी कोचमुळे प्रवास तर आरामदायी होत आहेच, त्याचबरोबर स्वच्छताही राखली जात असल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.
नैर्त्रुत्य रेल्वेने आठवडाभरापूर्वी गोवा एक्स्प्रेसला एलएचबी कोच जोडत असल्याचे जाहीर केले. रविवार दि. 18 पासून एलएचबी कोच असलेली गोवा एक्स्प्रेस धावू लागली. यामुळे वास्को, लोंढा, बेळगाव, मिरज, सातारा, पुणे येथील प्रवाशांना राजधानीपर्यंतचा प्रवास सोयीचा होत आहे. रेल्वे विभागाने लांबपल्ल्यांच्या गाड्यांना एलएचबी कोच जोडण्यास सुरुवात केली होती. परंतु, गोवा एक्स्प्रेसला नवे कोच लावले जात नसल्याने प्रवाशांमधून नाराजी होती.
स्टीलचा वापर करून एलएचबी कोचची निर्मिती होते. यामुळे रेल्वेच्या डब्यामधील जागेत भर पडते. याचबरोबर आधुनिक प्रकारे स्वच्छतागृह व इतर सुविधा या कोचमध्ये दिल्या जातात. बेळगावमधून दिल्लीला जाण्यासाठी गोवा एक्स्प्रेस हक्काची असल्यामुळे शेकडो प्रवासी प्रवास करतात. एलएचबी कोच जोडण्यात आल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.









