स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त राबविलेला उपक्रम, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांच्या हस्ते उद्घाटन
सांगे : गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या अंतर्गत साळावली धरणावर नेत्रदीपक अशी रोषणाई करण्यात आली आहे. गेल्या वर्षी 15 ऑगस्टला रोषणाई करण्यात आली होती. यावर्षी दहा दिवस अगोदरच केली आहे. जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांच्या उपस्थितीत या रोषणाईचे उद्घाटन केले. लोकांसाठी ही एक पर्वणीच ठरणार असून साळावली धरण पर्यटक आणि अन्य लोकांसाठी रात्री 9 पर्यंत खुले राहणार आहे. यावेळी जलस्रोत खात्याचे अतिरिक्त मुख्य अभियंता अंकुश गावकर व अन्य अभियंते हजर होते. निसर्गाने सांगेला भरभरून दिले आहे. साळावली धरणाच्या जलाशयाची खोली 40 मीटरांहून जास्त आहे. जून महिना उलटल्यानंतरही दक्षिण गोव्याला आणखी दोन महिने पाणी उपलब्ध होऊ शकते इतका मोठा येथे साठा असतो. ऑगस्टमध्ये जसा पाणीसाठा असतो तसाच तो मेपर्यंत राहावा यादृष्टीने जलव्यवस्थापन केले जाईल, असे यावेळी जलस्रोतमंत्री शिरोडकर यांनी सांगितले.
जलाशयातील गाळ उपसावा : फळदेसाई
साळावली धरणाच्या शेजारीच वेलनेस सेंटर उभारण्याची योजना असून ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे केंद्र असेल, असे सांगेचे आमदार तथा समाजकल्याणमंत्री फळदेसाई यांनी सांगितले. या ठिकाणच्या बांधून पडून असलेल्या 20 कॉटेजिसना पुनरुज्जीवित करण्यात आले असून नवीन कॉटेजिसही साकारणार आहेत. येथे 16 हजार चौरस मीटर जमीन घेण्यात आली असून त्यात कुणबी ग्राम साकारणार आहे. धरण परिसर सुंदर होणार असून त्याचा फायदा सरकारला, पर्यटनाला व लोकांना व्हावा यादृष्टीने अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यात धरणाच्या मजबुतीकरणाचा देखील समावेश राहणार आहे, असे त्यांनी सांगितले. पाण्याचा साठा वाढविण्याच्या दृष्टीने जलाशयातील गाळ उपसण्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणी फळदेसाई यांनी केली.
जलक्रीडेला चालना देण्याचा विचार
या धरणाचे आणखी एक वैशिष्ट्या म्हणजे वनविकास महामंडळाने विकसित केलेले बोटॅनिकल गार्डन असून गेल्या वर्षी लाखभर पर्यटक येथे येऊन गेलेले आहेत. पुढील सहा महिन्यांत कॉटेजिस कार्यान्वित होतील. येत्या एक-दीड वर्षांत धरणाच्या खाली पाजीमळ भागात जलक्रीडेला चालना देण्याचा त्याचप्रमाणे पाजीमळ येथील खात्याच्या जागेत कारंज्यांचा बगिचा साकारण्याचा आपला विचार आहे, असे यावेळी जलस्रोतमंत्री शिरोडकर यांनी सांगितले.









