मेलाटोनिन हार्मोन उशिराने होतात रिलिज
जे लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहतात, त्यांना चुकीच्या गोष्टोचे व्यसन लागत असल्याचे एका नव्या संशोधनातून समोर आले आहे. या वाईट व्यसनांमुळे लवकर मृत्यू होण्याची शक्यता 9 टक्क्यांनी वाढते. दिवसा जागे राहणाऱ्यांच्या तुलनेत रात्री जागणारे लोक तंबाखू, मद्याचे सेवन अधिक करतात. अशा लोकांना याचे व्यसन लागते आणि ते धोकादायक असल्याचे फिनलंडमध्ये झालेल्या संशोधनात दिसून आले आहे. संशोधकांनुसार रात्री उशिरा झोपणाऱ्यांच्या शरीरात मेलाटोनिन हार्मोन विलंबाने रिलिज होतात, या हार्मोनची झोप येण्यात महत्त्वाची भूमिका असते. प्रत्यक्षात प्रत्येक व्यक्तीचे एक अंतर्गत 24 तासांची बॉडी क्लॉक किंवा सर्केडियन रिदम असते. हे झोप येण्यासाठी मेलोटोनिन हार्मोन रिलिज करण्यासाठी जबाबदार असते. रात्री उशिरा झोपणाऱ्या लोकांमध्ये हे विलंबाने रिलिज होते, ज्यामुळे झोप उशिरा आणि लोक सकाळी लवकर उठू शकत नाहीत. यामुळे ते उशिराने झोपून लवकर उठले तरीही ताजेतवाने राहू शकत नाहीत, अशा लोकांमध्ये दुपार-संध्याकाळनंतर ऊर्जा संचारत असते.
24 हजार जुळ्यांवर संशोधन
हे संशोधन क्रोनोबायालॉजी इंटरनॅशनलमध्ये प्रकाशित झाले. यासाठी 1981-2018 दरम्यान 24 हजार जुळ्या लोकांचे आरोग्याशी निगडित वर्तन आणि आजारांवर अध्ययन करण्यात आले. या लोकांना झोपेच्या चक्राबद्दल प्रश्न विचारण्यात आले. 10 टक्के लोकांनी उत्तरादाखल रात्री उशिरापर्यंत जागे राहत असल्याचे सांगितले. 33 टक्के लोकांनी रात्री उशिरापर्यंत जागणे पसंत असल्याचे नमूद केले. 29 टक्के लोकांनी रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठत असल्याचे म्हटले. 27.7 टक्के लोकांना सकाळी लवकर उठणे पसंत होते.
मृत्यू नोंदींचेही अध्ययन
37 वर्षांदरम्यान (1981-2018) 8,728 लोकांचा मृत्यू झाला. अध्ययनासाठी त्यांच्या मृत्यूंच्या नोंदी पाहिल्या गेल्या. यादरम्यान त्यांची शैक्षणिक पात्रता, झोपण्याची वेळ, व्यसन करण्याच्या सवयींचे अध्ययन करण्यात आले. रात्री लवकर झोपी जाणाऱ्यांच्या तुलनेत रात्री उशिरापर्यंत जागे राहणाऱ्या लोकांचा मृत्यू लवकर झाल्याचे यात दिसून आले आहे.









