बेळगाव : सोमवार पेठ-मंगळवार पेठ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने बुधवारी व्यसनमुक्ती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. आरपीडी कॉलेजपासून सुरू झालेली ही रॅली देशमुख रोडमार्गे सोमवार पेठ येथील गणेशोत्सव मंडळाच्या मंडपापर्यंत काढण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस आयुक्त भूषण बोरसे उपस्थित होते. व्यसनमुक्ती रॅलीमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. टिळकवाडी परिसरातील शाळांचे विद्यार्थी रॅलीमध्ये सहभागी होऊन नागरिकांना व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला. यावेळी बोलताना पोलीस आयुक्त भूषण बोरसे म्हणाले, विद्यार्थ्यांनी अभियंता, डॉक्टर होण्याबरोबरच देशाचा चांगला नागरिक होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली.
किरण गावडे म्हणाले, बेळगाव शहरामध्ये गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून विद्यार्थी व तरुणांना व्यसनाधीन करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. गांजा, चरस, गुटखा, दारू, सिगारेट या व्यसनात विद्यार्थ्यांना ओढले जात आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. भूषण बोरसे यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. या कार्यक्रमात एचपी गॅसतर्फे नागरिकांना गॅस वापरताना घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. वितरक दीपक लेंगडे व भूषण बोरसे यांच्या हस्ते ध्वनिफितीचे उद्घाटन झाले. सचिव राजू नाईक यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी बालिका आदर्श, हेरवाडकर, ठळकवाडी हायस्कूल या शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी अध्यक्ष शशिकांत खासबाग, राजू नाईक, किरण गावडे, राजू वर्पे, जयराम शेंडे, संतोष वर्पे, सचिन हंगिरगेकर, प्रमोद लेंगडे, रणजित पाटील, कृष्णा गवळी, अभिषेक बांदिवडेकर यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.









