कर्नाटकाची राजधानी बेंगळूर येथे पावसाने कहर केला आहे. परतीच्या पावसाने बेंगळूरकरांना हैराण केले आहे. ज्या आयटी कंपन्यांमुळे बेंगळूर सिलिकॉन सिटी म्हणून जगभरात ओळखले जाते त्या आयटी कंपन्यांना या पावसाचा फटका बसला आहे. जिकडे तिकडे पावसाचे पाणी साचून वाहतूक बंद पडल्याने या कंपन्यांचे कर्मचारी वेळेत कामावर हजर राहू शकले नाहीत. परिणामी त्यांनी कर्मचाऱयांना पुन्हा एकदा ‘वर्क फ्रॉम होम’चा आदेश जारी केला आहे. तसेच सरकारने या पाणी तुंबण्यावर तोडगा काढला नाही तर बेंगळूर त्यागण्याचा इशाराही दिला आहे. गेल्या गुरुवारी 1 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळूर दौऱयावर आले होते. त्यावेळी प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करून कर्नाटकात त्यांचे स्वागत केले होते.
3 हजार 800 कोटी रुपयांच्या आठ विविध योजनांचे उद्घाटन व कोनशिला समारंभासाठी पंतप्रधान मंगळूरला आले होते. प्रवीण नेट्टारू हत्या प्रकरणानंतर भाजपच्या पदाधिकाऱयांनी आपल्या पदांचे राजीनामे देण्याचे सत्र सुरू केले. त्यामुळे पक्षाला मोठा धक्का बसला होता. नरेंद्र मोदी यांच्या मंगळूर दौऱयामुळे या परिस्थितीत सुधारणा होत आहे. यासाठीच त्यांचा कर्नाटक दौरा होता. 12 सप्टेंबरपासून विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनात 40 टक्के कमिशनचा मुद्दा ठळकपणे उपस्थित करण्याचे काँग्रेसने ठरविले आहे. याचवेळी कर्नाटकातही भ्रष्टाचारमुक्त व विकासाभिमुख सरकार हवे आहे, असे उद्योजक टी. व्ही. मोहनदास पै यांनी पंतप्रधानांना ट्विट केले. एकीकडे काँग्रेस व राज्यातील कंत्राटदारांनी काही मंत्री व आमदारांवर 40 टक्के कमिशनचा आरोप केलेला असतानाच उद्योजकांनी केलेले ट्विट लक्षवेधी ठरले आहे. ‘पावसापासून बेंगळूरला वाचवा’ असे ट्विट करून पंतप्रधानांना टॅग करण्यात आले. त्यामुळे लवकरच कर्नाटकातील उद्योजकांची बैठक आयोजित करण्याचा निर्णय मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी घेतला आहे.
एकीकडे भाजप सरकारच्या भ्रष्टाचारावर हल्लाबोल करण्याच्या तयारीत काँग्रेस आहे. त्याचवेळी काँग्रेस सत्तेवर असताना झालेली भ्रष्टाचाराची प्रकरणे उकरून काढून पुन्हा या प्रकरणांची चौकशी सुरू करण्याचे भाजपने ठरविले आहे. 12 सप्टेंबरपासून सुरू होणारे दहा दिवसांचे विधिमंडळ अधिवेशन वादळी ठरण्याची शक्मयता आहे. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, भाजप प्रदेशाध्यक्ष नळिनकुमार कटिल व मुख्यमंत्री बसवराज बोम्माई आदींसह वरि÷ नेत्यांनी बैठक घेऊन काँग्रेसच्या राजवटीत झालेली भ्रष्टाचार प्रकरणे उकरून काढून 40 टक्के कमिशनच्या आरोपाला ठोस प्रत्युत्तर देण्याचे ठरविले आहे. केवळ अधिवेशनात काँग्रेसचे हल्ले परतावणे यापुरतेच हे मर्यादित नाही. गरज भासली तर या प्रकरणांची पुन्हा चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सतत होणाऱया भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सरकारच्या प्रतिमेला धक्का बसतो आहे. निवडणुका तोंडावर असताना सदरच्या आरोपांना जशास तशी उत्तरे दिली नाहीत तर जनतेच्या मनातील सरकारची प्रतिमा मलीन होण्याची शक्मयता आहे. त्यामुळेच काँग्रेसला टक्कर देण्याचे भाजपने ठरविले आहे.
पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवि यांनी या बैठकीनंतर हा केवळ टेलर आहे, पिक्चर अभी बाकी है, असे सांगितले. यावरून सोमवारपासून सुरू होणारे अधिवेशन वादळी ठरणार याची सर्व लक्षणे दिसून येत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर पक्ष आणि सरकारची प्रतिमा डागाळू नये, यासाठी हायकमांड कितीही काळजी घेत असले तरी या प्रतिमांना धक्का पोहोचेल, अशी कृती नेत्यांकडून सुरूच आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना गेल्या गुरुवारी 1 सप्टेंबर रोजी माजी मंत्री अरविंद लिंबावळी यांनी रुथसगाई मेरी अमिला या महिलेवर अरेरावी केली आहे. जाहीरपणे झालेल्या या अरेरावीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या मुद्दय़ाला इतके महत्त्व का दिले जात आहे? मी काय तिच्यावर अतिप्रसंग केला आहे का? असा प्रश्न अरविंद लिंबावळी यांनी उपस्थित केला आहे. या मुद्दय़ावरही गेल्या आठवडाभरापासून वादंग सुरू आहे. काँग्रेस व आपने त्यांच्यावर जहरी टीका केली आहे. आपल्या समस्या सांगण्यासाठी आलेल्या महिलेवर अरेरावी करणारे आमदारपदावर राहण्यास योग्य नाहीत, असे सांगत प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी या महिलेला पाठिंबा जाहीर केला आहे.
मुरुघा मठाधीश डॉ. शिवमूर्ती स्वामीजींनी आपल्याविरुद्ध प्रसारमाध्यमांनी कसल्याच प्रकारच्या बातम्या छापू नयेत, यासाठी न्यायालयातून मनाई आदेश मिळविला आहे. या प्रकरणाचे पडसाद बेळगाव जिल्हय़ात उमटले आहेत. बैलहोंगल तालुक्मयात नेगीनहाळ नामक एक गाव आहे. या गावातील श्री गुरू मडिवाळेश्वर मठाचे बसवसिद्धलिंग स्वामीजी (वय 50) यांनी आपल्या मठात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सोमवारी 5 सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आले आहे. बसवसिद्धलिंग स्वामीजींचे आध्यात्मिक शिक्षण मुरुघा मठात झाले होते. मुरुघा मठाधीशांवर पोक्सो कायद्यांतर्गत दाखल झालेला एफआयआर व त्यानंतर त्यांच्यावर झालेली अटकेची कारवाई यामुळे नेगिनहाळ मठाधीश व्यथित झाले होते. यातच दोन महिलांनी राज्यातील काही प्रमुख मठाधीशांबद्दल केलेल्या संभाषणाचा ऑडिओ व्हायरल झाला. या ऑडिओत नेगीनहाळ मठाधीशांचाही नामोल्लेख आहे. त्यामुळे स्वामीजींनी आत्महत्या केली आहे.
अन्न व नागरी पुरवठा तथा वनमंत्री उमेश कत्ती यांचे मंगळवारी 6 सप्टेंबर रोजी हृदयाघाताच्या तीव्र झटक्मयाने निधन झाले आहे. तब्बल आठवेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या उमेश कत्ती यांच्या वाटय़ाला केवळ एकदाच पराभव आला होता. उत्तर कर्नाटकात भाजपची भक्कम फळी निर्माण करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. अधूनमधून स्वतंत्र उत्तर कर्नाटकाची मागणी करून ते ठळक चर्चेत यायचे. अलीकडे नेतृत्व बदलाची चर्चा सुरू झाली, त्यावेळी आपणही मुख्यमंत्रीपदाचा दावेदार आहे, असा दावा त्यांनी केला होता. बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे बसवराज बोम्माई मंत्रिमंडळात त्यांना मंत्रिपद मिळाले तरी बेळगावचे पालकमंत्रीपद मिळाले नाही. त्यांना बागलकोटचे पालकमंत्रीपद देऊन बेळगावची जबाबदारी गोविंद कार्जोळ यांच्यावर टाकण्यात आली होती. त्यामुळे ते नाराज होते. बेळगाव जिल्हय़ाचे पालकमंत्रिपद त्यांना मिळेल, अशी अटकळ होती. मात्र, त्याआधीच नियतीने डाव साधला आहे.
-रमेश हिरेमठ








