पाकिस्तान विरोधात रस्त्यावर उतरले लोक
वृत्तसंस्था/ स्कार्दु
पाकिस्तानातील आर्थिक संकटादरम्यान गिलगिट-बाल्टिस्तानचे लोक तेथील सरकार आणि सैन्याच्या विरोधात मागील 12 दिवसांपासून निदर्शने करत आहेत. कारगिल रोड खुला करत गिलगिट-बाल्टिस्तानला भारताच्या लडाखमधील कारगिल जिल्हय़ात सामील करण्याची मागणी हे लोक करत आहेत. पाकिस्तान सरकार आमच्यासोबत भेदभाव करत आहे, परंतु आता आम्हीच गिलगिट-बाल्टिस्तानसंबंधी निर्णय घेऊ असे या निदर्शकांनी म्हटले आहे.
पाकिस्तानचे सैन्य डेमोग्राफी बदलण्यासाठी अन्य प्रांतांमधील लोकांना गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये वसविण्याच्या दृष्टीने पावले उचलत आहे. पाकिस्तानी पंजाब आणि खैबर-पख्तूनख्वाचे लोक आमच्या जमिनींवर कब्जा करत असून त्यांना पाकिस्तानी सैन्याचे समर्थन असल्याचा आरोप निदर्शकांनी केला आहे. याप्रकरणी भारताने हस्तक्षेप करावा अशी मागणी या निदर्शकांकडून केली जात आहे.

‘आर-पार जोड दो, काश्मीर का द्वार खोल दो’ अशा घोषणा निदर्शकांकडून दिल्या जात आहेत. आमच्यासंबंधीचे निर्णय इस्लामाबादमधील सरकार घेणार नाही, आम्हीच याची अनुमती त्यांना देणार नाही. गिलगिट-बाल्टिस्तानचा निर्णय आात येथील जनता घेणार असल्याचे निदर्शक म्हणत आहेत.
गिलगिट क्षेत्रातील मिनावर गावात पाकिस्तानी सैन्य स्थानिक लोकांच्या मालमत्ता पाडविण्यासाठी पोहोचले होते. यामुळे संतापलेल्या स्थानिक लोकांनी पाकिस्तानी सैन्याच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे. सैन्य अवैध कमाई करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने लोकांच्या जमिनी हडप करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. सैन्याला विरोध करत असलेल्या मिनावर गावातील लोकांना आता क्षेत्रातील जनतेचेही समर्थन मिळत आहे. सैन्याने गोळय़ा घातल्या तरीही जमीन गिळंकृत करू देणार नसल्याचे निदर्शकांनी म्हटले आहे.
पाकिस्तानी सैन्य येते आणि आम्हाला मारहाण करून आमच्या जमिनीवर कब्जा करते. कुठलीही भरपाई न देता सैन्याने मोठा भूभाग हपडला आहे. आता आम्ही त्यांना एक इंचही जमीन देणार नाही. पाकिस्तानी सैन्य बळजबरीने आमची घरे आणि शेतजमिनींवर कब्जा करत असल्याचा आरोप स्थानिक लोक करत आहेत.
अवैध करामुळे संताप
गिलगिट-बाल्टिस्तानचे लोक अनेक समस्यांना तोंड देत आहेत. अवैध करवसुली, वाढती महागाई आणि बेरोजगारीमुळे लोकांमध्ये पाकिस्तानविरोधी भावना बळावू लागली आहे. मूलभूत अधिकारांची मागणी केल्यावर लोकांना लाठीमाराला तेंड द्यावे लागत आहे.









