अदानी डिजिटल लॅब्जकडून होणार व्यवहार : व्यवहाराची रक्कम गुलदस्त्यात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रेल्वे क्षेत्रात आणखी एक मोठा व्यवहार होणार असून यात भारतातील दिग्गज उद्योग समूह अदानी एंटरप्रायझेसचा सहभाग असणार असल्याचे म्हटले जात आहे. अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडची सहकारी कंपनी अदानी डिजिटल लॅब्ज यांच्या मार्फत ऑनलाइन ट्रेन तिकीट बुकिंग स्टार्टअप ‘ट्रेनमॅन’चे अधिग्रहण करण्यात येणार असल्याचे समजते.
ट्रेनमॅन याची मालकी ही स्टार्क एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे आहे. अदानी डिजिटल लॅब्ज ट्रेन बुकिंग स्टार्टअप ट्रेनमॅनचे 100 टक्के अधिग्रहण करणार असून ट्रेनमॅनचे संस्थापक व सध्याच्या समभागधारकांसोबत अदानीने करारावर स्वाक्षऱ्या केल्याची माहिती मिळते आहे. सदरचा खरेदीचा व्यवहार झाला असला तरी हा व्यवहार किती रक्कमेचा झाला आहे याबाबत खुलासा करण्यात आलेला नाही.
ट्रेनमॅनविषयी…..
ट्रेनमॅन हे एक आयआरसीटीसी अधिकृत ऑनलाइन ट्रेन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म आहे. गुरुग्राममधील स्टार्क एंटरप्रायझेस यांच्याकडे मालकी हक्क आहेत. या प्लॅटफॉर्ममार्फत ग्राहकांना रेल्वे तिकीट बुकिंग तर करता येतेच शिवाय पीएनआर स्टेटस, कोचची स्थिती, ट्रेनचे लाइव्ह स्टेटस आणि सीटची उपलब्धता यासंदर्भातील माहितीही जाणून घेता येणार आहे.









