देशांतर्गत व्यवसाय विस्तारावर भर : यावर्षी गुंतवणूक दुप्पट : बंदरांवर मालाची देवाणघेवाण वाढणार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
बंदर क्षेत्रातील कंपनी अदानी पोर्ट पुढील दोन वर्षांमध्ये 30 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी करत आहे. ही गुंतवणूक चालू आर्थिक वर्षातील अंदाजे 11 हजार ते 12 हजार कोटींपेक्षा दुप्पट आहे. अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन यांच्यामार्फत देशांतर्गत व्यवसाय वाढीसाठी वरीलप्रमाणे गुंतवणूक केली जाणार आहे. यामधला गुंतवणुकीचा सर्वात मोठा हिस्सा गुजरातमधील मुंद्रा, ओडीसातील धमरा आणि केरळमधील विझिनजम बंदरामध्ये गुंतविला जाणार आहे. 2030 पर्यंत वर्षाला 1 अब्ज टन मालाची देवाण-घेवाण करण्याची क्षमता साध्य केली जाणार आहे. या अंतर्गत बंदरांसाठी 6500 ते 7 हजार कोटी रुपये तर लॉजिकस्टीकसाठी 2300 कोटी रुपये गुंतविले जाणार आहेत. या शिवाय 2200 कोटी रुपयांची गुंतवणूक इतर विभागांमध्ये केली जाणार आहे. विझिनजम या बंदराने केवळ 9 महिन्यांमध्ये 1 दशलक्षपेक्षा अधिक कंटेनर हाताळण्याचे कार्य साध्य केले आहे.
अदानींकडे 15 बंदरे
आर्थिक वर्ष 2025 अखेरपर्यंत अदानी पोर्टकडे भारतातील 15 बंदरे आणि टर्मिनल होती. या बंदर व टर्मिनलयोगे 633 दशलक्ष टन मालाची देवाण-घेवाण केली जाते. यात आता नव्याने गुंतवणूक करुन व्यवसाय विस्तारावर कंपनी भर देणार आहे. मागच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत दुप्पट रक्कम यंदा गुंतवली जाणार आहे.









