ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्या न्यायालयीन चौकशीचे समर्थन केल्यामुळे आतल्या अंगाने, कुत्सित स्वरूपात टीका सुरू आहे. काहींना या समर्थनाचा आनंद झाला आहे. मात्र ते पवारांनी केले याचा जळफळाटही आहे. अशा मंडळींकडून पवार आणि अदानी चर्चा करत बसलेल्या फोटोसह ‘मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’ अशी गमतीदार काव्यात्म टीकाही झाली आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पवारांवर टीका करणे टाळले असले तरी लांबा नावाच्या कनिष्ठ प्रवक्त्यांनी टीका केली आहे. ते रिट्विट करत कोणी हे काँग्रेसचे ‘चाल-चरित्र’ असल्याचे म्हटले आहे, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांवरील काँग्रेसच्या टीकेला चुकीचे ठरवत रिट्विट केले आहे. चंद्रकांतदादा पाटील यांनी तर आपण दोनच दिवसांपूर्वी महाविकास आघाडी फार काळ टिकणार नाही. त्यांच्यात अंतर्विरोध वाढतील हे बोल इतक्मया लवकर खरे होईल असे वाटले नव्हते असे सांगत येत्या दीड वर्षात प्रत्येक निवडणुकीआधी महाविकास आघाडी कमकुवत होईल आणि भाजप विजयी होत राहील असे भविष्य मांडले आहे. भाजप नेत्यांची प्रमुख अडचण ही झाली आहे की, त्यांना शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेचे खुलेपणाने समर्थनही करता येईना. कारण राहुल गांधी यांनी अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मैत्रीच्या संबंधावर बोट ठेवून गोची केली आहे. मोदी यांच्या मदतीनेच त्यांनी चुकीच्या मार्गाने संपत्ती जमवण्याचा आरोप केला आहे. ते ज्या देशात गेले तिथले ठेके अदानी यांनाच कसे मिळाले आणि तीस हजार कोटीची रक्कम अदानींच्या ढासळत्या साम्राज्याला वाचवण्यासाठी अचानक कुठून गुंतवली गेली? हा पैसा कुणाचा? असे विविध प्रŽ विचारून पंतप्रधानांना निऊत्तर केले आहे. या प्रकरणी संयुक्त संसदीय चौकशी समितीची काँग्रेस, आप आणि इतर पक्षांची मागणी आहे. त्या एकीमुळे सत्तापक्षालाच गदारोळ करून कामकाज बंद पाडून वेळ माऊन न्यावी लागली आहे. इतके महाभारत झाल्यानंतर पवार संयुक्त संसदीय समितीला निरर्थक ठरवत सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या न्यायालयीन समितीमार्फत चौकशीचे समर्थन केले आहे. त्यामुळे अडीच महिने माथेफोड केलेले विविध पक्ष आणि जनताही चक्रावली नसती तरच नवल. अडीच महिन्यांपूर्वी हिंडनबर्गने अदानी यांच्यावरील संशोधनावर आधारित ‘अदानी ग्रुप : हाऊ द वर्ल्ड्स थर्ड रिचेस्ट मॅन इज पुलिंग द लार्जेस्ट कॉन इन कॉर्पोरेट हिस्टरी’ हा अहवाल प्रसिद्ध केला. अर्थात अदानी ग्रुपने तो अहवाल फेटाळून त्याला देशभक्तीत लपेटण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. कायदेशीर कारवाईचाही इशारा दिला. पण केली नाही! अदानींचे शेअर्स गडगडले. कंपनीला आपला एफपीओ रद्द करावा लागला. रिझर्व्ह बँकेने अदानींना कर्ज देणाऱ्या कंपन्यांकडून माहिती मागितली. त्याचवेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकिंग सेक्टर चांगल्या स्थितीत आहे. आर्थिक बाजारपेठा नियमांनुसारच काम करत असल्याचं म्हणत अहवालाआधीच त्याचे भवितव्य संपवले. पण खुद्द मोदी यांना अदानी यांचे नाव घेऊन संसदेत उत्तर देणे शक्मय झाले नाही. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मात्र अदानी यांच्याच चॅनेलवर उघडपणे त्यांच्या सोयीचे वक्तव्य केले. पवार परिवारातील सदस्यांसोबतच त्यांच्या मुली आणि सासरच्यांच्या मागे सरकारने चौकशी लावली असल्यामुळे पवारांचे असे वक्तव्य येत आहे असे सांगणाऱ्या पोस्ट सुद्धा सध्या समाज माध्यमावर पसरवल्या जात आहेत. पण पवार यांच्या विरोधात उघड बोलण्याचे धाडस फारसे कोणी दाखवलेले नाही. कारण स्पष्टच आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये अदानी यांची गुंतवणूक आहे. त्यात काँग्रेसचे अशोक गेहलोत आणि बंगालच्या ममता बॅनर्जीही अपवाद नाहीत. पण, पवार यांनी खुलेपणाने वक्तव्य करून लोकांचा रोष मात्र आपल्यावर ओढवून घेतला आहे. त्यांच्या आत्मचरित्रात अदानींचा करण्यात आलेला गौरव, बारामतीतील संस्थांना त्यांनी दिलेली भेट, आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या गाडीचे केलेले सारथ्य आणि त्यांच्या संस्थांतील विद्यार्थ्यांना मिळालेली अदानींची शिष्यवृत्ती या सगळ्याची चर्चा या निमित्ताने झाली आहे. देशातील उद्योगपतींशी पवारांचे असलेले संबंध लपून राहिलेले नाहीत. खुद्द युपीएकाळात पवार मंत्री असताना अजित गुलाबचंद यांच्या लवासा आणि अदानींच्या विदर्भातील कंपन्यांच्या मागे पर्यावरण मंत्री म्हणून जयराम रमेश यांनी चौकशीचा ससेमिरा लावला होता. एका अर्थाने तो पवारांच्या वाढत्या महत्वकांक्षेला शह होता. युपीए काळात असे करून काँग्रेसने पक्षातील सगळे लोकनेते आणि लालुंसारखे मित्रही गमावले. आज जेव्हा काँग्रेस अडचणीतून बाहेर पडण्यासाठी तळमळतो आहे तेव्हा हेच लोकनेते जी भूमिका घेतात त्यामुळे काँग्रेसची गोची होत आहे. सत्तेत असताना मैत्री न जपणे भविष्यात घातक ठरते हे काँग्रेसला उमगले असावे. भाजपला नंतर उमगेल. तर केवळ सत्तेसोबत राहून चालत नाही हे अदानींना अधिक समजले असेल. पवारांचा या वक्तव्यामागील हेतू काहीही असेल. पण एक पक्षाचा प्रमुख म्हणून त्यांनी स्वत:ची वेगळी भूमिका स्पष्ट करण्याचे धाडस दाखवले आहे. मोदींच्या विरोधात वातावरण तयार होताना त्यांनी विरोधी ऐक्मयाला तडा दिला का? त्याचे उत्तर काळच देईल. पण, काही लढाया या स्वत:च्या जीवावरच लढायच्या असतात हे काँग्रेसला आता उमगले असेल. लवासाला जसे पवार विसरले नसतील तसेच मुलींच्या घरी ‘पाहुणे’ पाठवल्याचा त्यांना विसर पडेल का? पवार यांनी वेगळी भूमिका घेतल्याने विरोधी ऐक्मयाला तडा जातो हे जर खरे असेल तर पवारांचे महत्त्वही जपले पाहिजे. राजकारणातील हे तिढे तसे समजणे व सोडवणे कठीणच. इथे प्रत्येकाला स्वत:चे राजकारण रेटायचे आहे. अदानी-अंबानींसारखे उद्योगपती हे त्यातील खेळणे आहेत. राजकारणी त्यांच्या हाताचे खेळणे बनू नयेत इतकेच.
Previous Articleमहिला क्रिकेट संघ प्रशिक्षकांची निवड आता दीर्घकालीन करारावर
Next Article येमेनमधील गृहयुद्ध संपण्याची चिन्हे
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








