वृत्तसंस्था /नवी दिल्ली
2024 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेला शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेसाठी राजस्थान रॉयल्स संघाने क्रिकेटपटूंच्या लिलावात खरेदी केलेला ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज अॅडॅम झम्पाने काही वैयक्तिक कारणास्तव स्पर्धेतून माघार घेतली आहे. झम्पाच्या माघारीमुळे राजस्थान रॉयल संघाला फार मोठा धक्का बसला आहे. गेल्या वर्षीच्या आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधीत्व झम्पा करीत होता. 2024 च्या आयपीएल स्पर्धेसाठी राजस्थान रॉयल्समधील झम्पाने आपले स्थान कायम राखले होते. गेल्या वर्षीच्या आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्सने झम्पाला 1.5 कोटी रुपयांच्या बोलीवर खरेदी केले होते. राजस्थान रॉयल्स संघामध्ये रविचंद्रन अश्विन आणि यजुवेंद्र चहल या फिरकी गोलंदाजांचाही समावेश आहे. 2008 साली राजस्थान रॉयल्सने आयपीएल चषक जिंकला होता. गेल्या वर्षी झम्पाने आयपीएल स्पर्धेत 6 सामने खेळले असून त्याने 23.50 धावांच्या सरासरीने 8 गडी बाद केले होते. चेन्नई विरुद्धच्या सामन्यात झम्पाच्या कामगिरीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने विजय मिळविला होता. झम्पाच्या माघारीमुळे राजस्थानची गोलंदाजी बाजू थोडी नाजूक झाली आहे.









