अभिनेत्री अदा शर्मा यापूर्वी ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटात दिसून आली होती. अदाने आता स्वत:च्या आगामी चित्रपटाचे चित्रिकरण सुरू केले आहे.
अभिनेत्री पुन्हा एकदा ‘द केरळ स्टोरी’चे निर्माते अमृतलाल शाह आणि सुदीप्तो सेन यांच्यासोबत काम करत आहे. चित्रपटात अदा ही कमांडोची भूमिका साकारणार असल्याचे समजते. द नक्सल स्टोरी हा चित्रपट सनशाइन पिक्चर्सच्या बॅनर अंतर्गत निर्माण केला जाणार आहे. हा चित्रपट 5 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. द केरळ स्टोरी हा चित्रपट सत्यघटनांवर आधारित होता. कशाप्रकारे निर्दोष बिगरमुस्लीम युवतींना इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनांमध्ये भरती करण्यात आले होते हे दाखविण्यात आले होते. या चित्रपटाला मोठी पसंती मिळाली होती. या चित्रपटाची निर्मिती विपुल अमृतलाल शाह यांनी केली होती. तर दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केले होते. अदा शर्मा हिने चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. हीच टीम आता द नक्सल स्टोरी या चित्रपटासाठी एकत्र आली आहे. हा नवा चित्रपट नक्षलवादावर आधारित असणार आहे. नक्षलवादाला विविध घटकांकडून मिळणारे सहाय्य, सुरक्षा दलांकडून राबविली जाणारी मोहीम यावर हा चित्रपट बेतलेला असू शकतो. अदा शर्मा यात मुख्य भूमिका साकारत असल्याने तिच्या चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.









