ईडीने बजावली नोटीस : चौकशीसाठी हजर रहावे लागणार
वृत्तसंस्था/ कोलकाता
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या युवा शाखेच्या प्रदेशाध्यक्ष आणि बंगाली अभिनेत्री सायोनी घोष यांना नोटीस बजावली आहे. ईडीने सायोनी घोष यांना शुक्रवारी कोलकाता येथील कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. सायोनी यांना काही वित्तीय व्यवहारांबद्दल प्रश्न विचारण्यात येणार आहेत.
कुंतल घोष यांची चौकशी सुरू असताना सायोनी घोष यांचे नाव समोर आले होते. याचमुळे ईडीने नोटीस बजावून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींच्या चौकशीदरम्यान सायोनी यांचे नाव अनेकदा समोर आले आहे. या घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीसोबत अनेक आर्थिक व्यवहार सायोनी केल्याचे पुरावे ईडीकडे आहेत. याचसंबंधीचे दस्तऐवज सोबत आणण्याची सूचना सायोनी यांना ईडीकडून करण्यात आली आहे.
ईडीने जून महिन्याच्या प्रारंभी याच घोटाळ्यासंबंधी तृणमूल काँग्रेसचे महासचिव अभिषेक बॅनर्जी यांना चौकशीसाठी बोलाविले होते. तर बंगालचे माजी शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी, त्यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी आणि शिक्षण विभागाच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना या घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.









