मुलगी साशा रुग्णालयात दाखल
बॉलिवूड अभिनेत्री रंभाचा कॅनडात अपघात झाला आहे. या अपघातादरम्यान तिच्या कारमध्ये मुले आणि एक नॅनी होती. परंतु या अपघातात कुणालाच गंभीर ईजा झालेली नाही. तरीही तिची मुलगी साशा सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. या अपघाताची माहिती रंभानेच सोशल मीडियावर छायाचित्रे शेअर करत दिली आहे.

शाळेतून मुलांना घरी आणताना आमच्या कारला एका अन्य कारने धडक दिली. मुलांना जखम झाली असली तरी आम्ही सर्व सुरक्षित आहोत असे रंभाने म्हटले आहे. छायाचित्रांमध्ये रंभाच्या कारचे झालेले नुकसान दिसून येते. याचबरोबर तिने मुलगी साशाचे हॉस्पिटलमधील छायाचित्र शेअर केले असून यात डॉक्टर तिच्यावर उपचार करताना दिसून येतात. रंभाची ही पोस्ट पाहिल्यावर चाहत्यांपासून कलाकारापर्यंत सर्वजण तिच्या मुलीची प्रकृती लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना करत आहेत.
रंभा ही भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री आहे. हिंदीसह तिने तेलगू, तमिळ, कन्नड, मल्याळी, बंगाली, भोजपुरी आणि इंग्रजी चित्रपटांमध्येही काम केले आहे. रंभाचे खरे नाव विजयलक्ष्मी आहे. तिने 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सलमान खानसोबत ‘जुडवा’ या चित्रपटात तिने काम केले होते. या चित्रपटामुळेच तिला खरी ओळख मिळाली होती. त्यानंतर तिने ‘घरवाली बाहरवाली’, ‘क्योंकी मैं झूठ नहीं बोलता’ यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.









