वृत्तसंस्था/ चेन्नई
प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या माजी खासदार जया प्रदा यांना चेन्नई न्यायालयाने एका जुन्या प्रकरणामध्ये 6 महिन्यांच्या शिक्षेसह 5,000 ऊपयांचा दंडही ठोठावला आहे. चेन्नईमधील रायपेटमध्ये जया प्रदा यांचे स्वत:च्या मालकीचे थिएटर आहे. त्यांच्या थिएटरमधील कर्मचाऱ्यांनी केलेल्या याचिकेप्रकरणी त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. या चित्रपटगृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ईएसआयची रक्कम न भरल्यामुळे कर्मचाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. अभिनेत्री जया प्रदा यांनी चित्रपटातील कर्मचाऱ्यांना पूर्ण रक्कम देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच खटला फेटाळण्यासाठी न्यायालयात दाद मागण्यात आली होती. मात्र, याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी त्यावर आक्षेप घेतल्यानंतर आता अभिनेत्री जया प्रदा यांच्यासह इतर तिघांना सहा महिन्यांच्या तुऊंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.









