25 वर्षांपासून भाजपमध्ये होती कार्यरत : फसवणुकीच्या घटनेची पार्श्वभूमी
वृत्तसंस्था/ चेन्नई
अभिनेत्री गौतमी तडिमल्ला यांनी 25 वर्षांमध्ये भाजपमध्ये राहिल्यावर सोमवारी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तसेच त्यांनी पक्षाला रामराम ठोकण्याचे कारणही स्पष्ट केले आहे. पक्षाबद्दलच्या स्वत:च्या प्रतिबद्धतेचा मी सन्मान केला, परंतु भाजपकडून मला कुठलेच समर्थन मिळाले नाही. याच कारणामुळे मी स्वत:च्या जीवनातील सर्वात मोठ्या संकटाला सामोरी जात असल्याचे गौतमी यांनी म्हटले आहे.
स्वत:च्या आयुष्यात मी अत्यंत अकल्पनीय संकटाला तोंड देत आहे. माझ्यासोबत विश्वासघात करणाऱ्या तसेच माझी आयुष्यभराची कमाई हडप करणाऱ्या व्यक्तीला पक्षाकडून मदत अन् समर्थन मिळत असल्याचे माझ्या निदर्शनास आल्याचे गौतमी यांनी म्हटले आहे. प्रत्यक्षात गौतमी यांचा इशारा सी. अलगप्पन यांच्याकडे होता. अलगप्पन हे एकेकाळी गौतमी यांचे साथीदार होते.
अलगप्पन यांनी माझे पैसे, मालमत्ता तसेच दस्तऐवज गिळकृंत केले. तामिळनाडू सरकार आणि न्यायालयाकडून मला अपेक्षा आहे. मी आता माझ्या आणि मुलांच्या भविष्यासाठी न्यायाची लढाई लढत असल्याचे गौतमी यांनी नमूद पेले आहे. गौतमी यांनी सप्टेंबर महिन्यात पोलिसांकडे तक्रार नोंदविली होती. वेलाचेरीचे रहिवासी सी. अलगप्पन आणि त्यांची पत्नी नाचल यांनी 25 कोटी रुपये आणि मालमत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप गौतमी यांनी केला होता.
2021 मधील तामिळनाडू विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपकडून राजापलायम मतदारसंघाची ऑफर देण्यात आली होती. पक्षाकडून उमेदवारीसंबंधी आश्वासन देण्यात आले होते, परंतु अखेरच्या क्षणी उमेदवारी नाकारण्यात आली. तरीही मी पक्षाशी एकनिष्ठ राहिले, परंतु पक्षाकडून समर्थन न मिळाल्याने मी खचल्याचे गौतमी यांनी सांगितले.









