बैलहोंगल येथील घटना, दुचाकीवरून आलेल्या दोघांचे कृत्य
प्रतिनिधी /बेळगाव
बैलहोंगल येथील चित्रपट अभिनेते व उद्योजक शिवरंजन बोळण्णावर (वय 64) यांच्यावर मंगळवारी रात्री गोळीबार झाला. मोटारसायकलवरून आलेल्या दोघा जणांनी त्यांच्यावर पाच फैऱया झाडल्या असून या हल्ल्यातून शिवरंजन बचावले आहेत. या घटनेने एकच खळबळ माजली आहे.
मंगळवारी रात्री 7.45 ते 8 च्या दरम्यान ही घटना घडली आहे. हनुमान मंदिराजवळील आपल्या जुन्या घराजवळ शिवरंजन आले होते. त्यावेळी मोटारसायकलवरून दोघेजण आले. पाठीमागे बसलेल्या तरुणाने शिवरंजन यांच्यावर पिस्तुलमधून गोळय़ा झाडल्या. प्रसंगावधान राखून त्यांनी स्वतःचा बचाव करून घेतला.
पाच फैऱया झाडूनही शिवरंजन यांना एकही गोळी लागली नाही, हे लक्षात येताच हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. लागलीच बैलहोंगल पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख महानिंग नंदगावी, बैलहोंगलचे पोलीस उपअधीक्षक शिवानंद कटगी, पोलीस निरीक्षक यु. एच. सातेनहळ्ळी आदी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
मिळकतीच्या वादातून हा हल्ला झाल्याचा संशय आहे. शिवरंजन यांच्या भावाच्या नातेवाईकाचा हल्ल्यात सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. रात्री बैलहोंगल परिसरात नाकाबंदी करण्यात आली. यासाठी पोलीसप्रमुखांनी तीन पथके नियुक्त केली आहेत.
बुधवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना शिवरंजन म्हणाले, आपल्यावर पाच गोळय़ा झाडण्यात आल्या. केवळ सुदैवाने आणि दैवी कृपेने आपण बचावलो आहोत. कोणत्या कारणासाठी आपल्यावर गोळीबार झाला, याची आपल्याला माहिती नाही. पोलीस तपासानंतरच ते स्पष्ट होणार असल्याचे त्यांनी सांगितले असले तरी पोलीस अधिकाऱयांसमोर आपल्या भावाच्या नातेवाईकांच्या नावांचा त्यांनी संशयित म्हणून उल्लेख केल्याचे समजते.
उपलब्ध माहितीनुसार शिवरंजन यांचे बंधू श्रीशैल बोळण्णावर यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे. महेश नावलगट्टी या तरुणाने शिवरंजन यांच्यावर गोळीबार केला असून त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी जाळे विणले आहे. महेश श्रीशैलच्या मेहुणीचा मुलगा आहे.