पत्रकार हल्ला प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
टीव्ही पत्रकारावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप असलेल्या तेलगू चित्रपट अभिनेते मोहन बाबू यांना सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. पत्रकारावरील हल्ल्याशी संबंधित प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने त्यांना दिलासा मिळाला आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या अटकेवर अंतरिम स्थगिती दिली होती. मोहन बाबू या नावाने ओळखले जाणारे मंचू भक्तवत्सलम नायडू हे तेलगू चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्यांपैकी एक आहेत. चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कारही मिळाला आहे. 500 हून अधिक चित्रपटांमध्ये काम करणारे मोहन बाबू हे राज्यसभेचे खासदारही राहिले आहेत. त्याच्याविरुद्ध टीव्ही पत्रकाराच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हैदराबाद पोलिसांनी मोहन बाबूंविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. तेलंगणा उच्च न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला होता. मोहन बाबू यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करताना वकिलांनी यापूर्वीच पत्रकाराची वैयक्तिकरित्या माफी मागितल्याचे स्पष्ट केले. तसेच त्याला झालेल्या नुकसानाची भरपाई देखील देण्यात आली आहे. यापुढे तपासात सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहे. त्यामुळे मोहन बाबू यांना अटक करण्याची गरज नाही, असे सांगण्यात आले. हा युक्तिवाद ग्राह्या धरत सर्वोच्च न्यायालयाने अभिनेत्याचा अटकपूर्व जामीन अर्ज स्वीकारत दिलासा दिला.









