अभिनेते दिगंबर नाईक यांनी जागवल्या गवाणकरांविषयीच्या आठवणी
बांदा : प्रतिनिधी
कोकण ही रत्नांची खाण आहे. त्यातील एक रत्न हरपले आहे. मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ लेखक असुनही त्यांचे पाय जमिनीवर होते. प्रत्येक माणसाशी त्याच्या वयोमाननुसार वागणारे ते व्यक्तिमत्व होते. माझे भाग्य आहे की त्यांनी लिहिलेल्या वस्त्रहरण या नाटकात मला तात्या सरपंचांची भूमिका करता आली. त्यांच्या हयातीत मला ही भूमिका साकारता आली. एकदा तर लेखक म्हणून त्यांनी मला थेट रंगमंचावर येत चॉकलेट देत आशीर्वाद देत ‘पुढे घेऊन जा रे बाबा’ अशी पाठीवर थाप मारत सांगितले. तो क्षण माझ्या नेहमी स्मरणात राहील, अशा शब्दात वस्त्रहरण नाटकात तात्या सरपंचांची भूमिका साकारणारे अभिनेते दिगंबर नाईक यांनी गंगाराम गवाणकर यांच्या विषयी आठवणी जागवल्या.कौतुक करणारे, प्रत्येकाचा आदर करणारे, विशेष म्हणजे कोकणातील ज्येष्ठ रंगभूमी सेवकाच्या निधनाने रंगभूमीचे मोठे नुकसान झाले आहे. माणूस गेल्यावर कुठे असतो, याबाबत मला काय माहिती नाही. मात्र, हे स्वर्गात गेल्यावर तेथे असणारे बाबूजी, दादा कोंडके, पु. ल. देशपांडे त्यांना वस्त्रहरणसारखे नाटक येथे लिहिण्यासाठी आग्रह करतील, असे मला वाटतं. ते माझ्या सदैव स्मरणात राहतील. या पिढीतील तात्या सरपंचाचा त्यांना सादर प्रणाम, असेही नाईक यांनी नमूद केले आहे.









