हिंडलगा : येथील बेळगाव-वेंगुर्ला रोडवर मिलिटरी गणपती मंदिरापासून जवळच अरगन तलावाच्या बाजूला दि. 25 रोजी दुपारी 3 वाजता जुनाट वृक्ष कोसळला होता. दिवसभर भरपूर पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जुना वृक्ष रस्त्याच्या मधोमध पडला. सुदैवाने कोणतीही प्राणहानी किंवा नुकसान झाले नाही. परंतु रहदारीचा रस्ता असल्याने वाहतुकीला मोठी अडचण झाली. येथून महाराष्ट्र, गोवा राज्याकडे जाणाऱ्या-येणाऱ्या बसेस, चारचाकी मोठी वाहने, व इतर वाहने जाण्या-येण्यासाठी मोठी अडचण झाली होती. याच रस्त्यावरुन सांबरा विभागाचे माजी जिल्हा पंचायत सदस्य नागेश देसाई व सामाजिक कार्यकर्ते गुरुनाथ अष्टेकर यांनी लागलीच वाहतुकीला मार्ग मोकळा करून देण्यासाठी पुढाकार घेवून रस्त्यावर पडलेल्या सर्व फांद्या हटविल्या. येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तींनी देखील या स्तूत्य उपक्रमाची दखल घेवून सहकार्य केले व पूर्ण रस्ता मोकळा करून दिला. त्यामुळे वाहन चालकांनी या कार्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्यांची स्तुती केली.
रस्त्याच्या दुतर्फा असलेले जुनाट वृक्ष हटवा
वन खात्यावर अवलंबून राहिले असता जनतेला तीन ते चार तास विलंब झाला असता. तरी वन खात्याने रस्त्याच्या दुतर्फा जुनाट वृक्ष हटविण्यासाठी या रस्त्याची पाहणी करून पावसाळ्यापूर्वीच झाडे हटवावीत, अशी मागणी पश्चिम भागातील नागरिकांनी केली आहे.









