प्रतिनिधी /पणजी
काँगेस पक्षाची ‘भारत जोडो’ यात्रा गोव्यातून जाणार नसली तरी गोव्यासाठी डिसेंबर 2022 मध्य़े स्वतंत्र यात्रा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र- कर्नाटकमधून जाणाऱया या ‘भारत जोडो’ यात्रेत गोव्यातील काँगेस कार्यकर्ते, पदाधिकारी मोठय़ा संख्येने सहभागी होणार आहेत, अशी माहिती भारत जोडो यात्रेच्या प्रवक्त्या निवृत्त विंग कमांडर अनुमा आचार्य यांनी पणजीत पत्रकार परिषदेत दिली. यावेळी गोवा प्रदेश काँगेसचे अध्यक्ष अमित पाटकर उपस्थित होते.
कन्याकुमारी ते काश्मिर अशी निघणारी ही यात्रा तामीळनाडू येथून येत्या 7 सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे. यात्रा सुमारे 150 दिवस म्हणजे पाच महिने चालणार असून 12 राज्ये आणि दोन केंद्रशासीत प्रदेशातून ही यात्रा भ्रमण करणार आहे. एकूण 3570 कि. मी. प्रवास यात्रेतून होणार असून काँगेसचे वरीष्ठ नेते त्यात सहभागी होणार आहेत, अशी माहिती आचार्य यांनी दिली.
महागाई, बेकारी, सामाजिक समस्या, दरवाढ आदी विषयांवर केंद्रातील आणि विविध राज्यातील भाजपाचे सरकार कसे अपयशी ठरले याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. मोदी सरकारच्या काळात देशाला सध्या तीन आजारांनी घेरले आहे. गरिब-श्रीमंत यांच्यातील दरी कमी होण्याऐवजी ती वाढत असून गरीब जास्त गरीब होत आहेत तर श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत, असा आरोप आचार्य यांनी केला.
सामाजिक धृवीकरण हा दुसरा आजार भाजपाने दिला असून बिगर भाजपाची सरकारे पाडून भाजपाचे सरकार स्थापन करण्यासाठी सत्ता केंदीकरण हा तिसरा आजार देशात बळावला आहे. या आजारांना जनता कंटाळली असून ‘मन की बात’ ला देखील विटली आहे. जनतेला आता ‘जन की बात’ ची गरज असून सर्वधर्म समभाव पुन्हा वाढीस लावण्यासठी ‘भारत जोडा’ यात्रा आयोजित केली आहे. ज्या राज्यातून भारत जोडो यात्रा जाणार नाही तेथे राज्य पातळीवर स्वतंत्र वेगळी यात्रा काढली जाणार असल्याचे आचार्य यांनी सांगितले.
विरोधीपक्षनेते मायकल लोबो यांच्या दिल्ली भेटीबाबत काही माहिती मिळाली नाही. काँगेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक हे 12 सप्टेंबर रोजी गोव्यात येणार असून नवीन विरोधीपक्षनेता निवड ते यावेळी जाहीर करतील असे प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले.
लोबो दिल्लीला कशासाठी गेले याची कल्पना नाही. पत्रकारांनीच त्यांना काय ते विचारून माहिती काढावी. लोबो-कामत यांना सोडून इतर काँगेस आमदारांशी आपण संपर्कात आहे. गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव व मुकुल वासनिक प्रथम आमच्याशी चर्चा करतील आणि नंतर दिल्लीत जाण्यापूर्वी विरोधीपक्षनेता घोषित करतील असे पाटकर म्हणाले.









