सांखळी नगराध्यक्ष रश्मी देसाई यांची माहिती : शहराच्या सौदर्याला येते बाधा
प्रतिनिधी / साखळी
नगरपालिकेच्या परवानगीशिवाय साखळी शहरात सर्वत्र लावण्यात आलेले विविध प्रकारचे बॅनर्स हे साखळी शहराच्या सौंदर्यात बाधा आणत आहेत. स्वच्छ सांखळी, सुंदर सांखळी या उपक्रमांतर्गत शहरातील सर्व बेकायदा बॅनर्स हटविण्याची मोहीम बुध. दि. 12 जुलैपासून हाती घेणार आहे, अशी माहिती नगराध्यक्षा रश्मी देसाई यांनी दिली.
साखळी शहरात तसेच पालिका क्षेत्रात विविध ठिकाणी अनेक राजकीय, संस्थांचे, विविध कार्यक्रमाचे, जाहिरातबाजी करणारे, शुभेच्छा देणारे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत. हे बॅनर्स लावताना पालिकेची योग्य परवानगी घेतली जात नाही. त्यामुळे नगरपालिकेला महसूल येत नाही. शिवाय एकदा लावण्यात येणारे बॅनर्स कार्यक्रम झाल्यानंतर किंवा जाहिरातबाजी झाल्यानंतर कोणीही स्वेच्छेने हटवत नाही. त्यामुळे ते बॅनर्स कितीतरी दिवस आहे तसेच राहतात. काही बॅनर्स तुटलेल्या अवस्थेत लोंबकळतात. त्यामुळे शहरात विद्रुप चित्र पहायला मिळते. अशा प्रकारांमुळे शहराच्या सौंदर्याला बाधा येते, त्यासाठी हे सर्व बॅनर्स नगरपालिका हटविणार आहे. असे नगराध्यक्ष रश्मी देसाई यांनी सांगितले.
यापुढे अशा जाहिरातबाजी, शुभेच्छा, कार्यक्रम किंवा अन्य प्रकारचे बॅनर्स लावण्यासाठी नगरपालिका जागा निश्चित करणार आहे. केवळ त्याच ठराविक जागांवर बॅनर्स लावण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे. तसेच त्यासाठीचे शुल्कही आकारले जाणार आहे. सदर परवानगी ठराविक दिवसांसाठी असणार. परवानगी घेण्यात आलेल्या ठराविक दिवसांत संबंधितांनी आपले बॅनर्स काढून न्यावे. अन्यथा त्यानंतर नगरपालिका स्वत: सदर बॅनर्स काढून जप्त करणार. अशी कारवाई करण्यात येणार आहे.
शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी कच्रयाच्या साफसफाई बरोबरच शहराला विद्रुप करणारे बॅनर्स हटविणे आवश्यक आहे. तुटून लोंबकळणारे हे बॅनर्स शहराच्या सौंदर्यात बाधा आणतात. असेही नगराध्यक्षा रश्मी देसाई यांनी सांगितले.









