महापालिका आयुक्त शुभा बी. यांचे आश्वासन : महापालिकेत महसूल विभागाची बैठक,फाईल्स गहाळ होण्याचे प्रमाणदेखील वाढले
बेळगाव : ई-आस्थी प्रणाली अंतर्गत मिळकतीची नोंद करून घेऊन ए व बी खाते देण्यास महसूल विभागातील अधिकारी विनाकारण विलंब लावत आहेत. त्याचबरोबर दिलेल्या फाईल्स गहाळ होण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. त्यामुळे याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. अशा प्रकारचे आरोप महसूल विभागावर करण्यात आले. त्यामुळे केवळ आरोप करण्यापुरते मर्यादित न राहता संबंधित अधिकाऱ्यांबाबत तक्रार करा, निश्चित कारवाई केली जाईल, असे महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी स्पष्ट केले.
महापौर मंगेश पवार यांनी सोमवारी महापालिका सभागृहात महसूल विभागाची बैठक आयोजित केली होती. यावेळी व्यासपीठावर महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, मनपा आयुक्त शुभा बी., सत्ताधारी गटनेते अॅड. हणमंत कोंगाली, विरोध गटनेते मुजम्मिल डोणी उपस्थित होते. तर महसूल उपायुक्त रेश्मा तालिकोटी, झोनल आयुक्त संतोष आनिशेट्टर, अनिल बोरगावी, प्रशासन उपायुक्त उदयकुमार तलवार यांच्यासह नगरसेवक आणि महसूल निरीक्षक व बिल कलेक्टर उपस्थित होते.
सुरुवातीला महसूल उपायुक्त उदयकुमार तलवार यांनी बैठकीला सुरुवात करताच नगरसेवक रवी साळुंके आणि सरकारनियुक्त नगरसेवक रमेश सोंटक्की यांनी सदर बैठकीला मनपा आयुक्तांनादेखील बोलाविण्यात यावे, अशी मागणी केली. कारण शहरात ई-आस्थीसाठी बोंबाबोंब सुरू आहे. अधिकाऱ्यांकडून केवळ कामे करून घेण्यासाठी चालढकल सुरू आहे. त्याचबरोबर दुपारी 3.30 वा. सुरू होणाऱ्या बैठकीची माहिती आम्हाला अवघ्या तासाभरापूर्वी कळविण्यात आली आहे.
किमान सकाळी तरी कळविणे गरजेचे होते, ई-आस्थीसाठी किती दिवसांचा कालावधी लागतो, हे पहिल्यांदा स्पष्ट करावे. कारण ई-आस्थीसाठी नागरिकांना खुळे होण्याची वेळ आली आहे. एका फाईलसाठी तीन ते सहा महिने लागत आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी रवी साळुंके यांनी केली. काही अधिकारी कामाच्या ताणाला कंटाळून रजेवर जात आहेत का? असा प्रश्न सरकारनियुक्त नगरसेवक रमेश सेंटक्की यांनी उपस्थित केला. विरोधी गट नेते मुजम्मिल डोणी यांनी 3.30 वाजता बैठक आहे, असे सांगण्यासाठी 3.15 ला. मला फोनद्वारे कळविण्यात आले. त्यामुळे सदर बैठकांना यावे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यावर महापौर मंगेश पवार यांनी शनिवारीच सोमवारच्या बैठकीबाबत अधिकाऱ्यांना सूचना केली होती. त्यांच्याकडूनच कळविण्यास विलंब झाला आहे, असे सांगितले.
सरकारनियुक्त नगरसेवक डॉ. दिनेश नाशीपुडी यांनी अपार्टमेंटमधील फ्लॅटना कशा पद्धतीने पीआयडी दिला जात आहे. याबाबत माहिती देण्याची मागणी केली. त्यावर महसूल उपायुक्त रेश्मा तालिकोटी म्हणाल्या, ई-आस्थी किंवा पीआयडीसाठी सीसी सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे मात्र ज्या मिळकती 10 सप्टेंबर 2024 पूर्वी बांधण्यात आल्या आहेत. त्यांना संबंधित अभियंत्यांचे मत जाणून घेऊन स्वतंत्र पीआयडी दिले जात आहेत. सीसी सर्टिफिकेटमुळे मनपाला जास्त महसूल मिळतो. बांधकाम परवाना घेऊन त्यांचे उल्लंघन केले जाते. त्यामुळे बहुतांश जण सीसी घेत नाही, असे सांगितले.
नगरसेवक शंकर पाटील म्हणाले, कोनवाळ गल्लीतील मनपाच्या विभागीय कार्यालयात ई-आस्थीसाठी दिलेली फाईल गायब झाली आहे. नगरसेवकांची कामे करून देण्यास जाणीवपूर्वक चालढकल केली जात आहे. मात्र एखादा एजंट गेल्यास त्यांची कामे तातडीने करून दिली जात आहेत. बऱ्याच वेळा बिल कलेक्टर व महसूल निरीक्षक आमचे फोनदेखील घेत नाहीत. दिलेली फाईल कोणत्या स्टेजवर आहे. हे समजणेदेखील कठीण झाले आहे, असा आरोप केला.
फाईल गहाळ झाल्यास बिल कलेक्टर जबाबदार
नगरसेवक नाकाडी यांनी महसूल निरीक्षकांकडे दिलेली फाईल लवकर निकालात काढण्यात येत नाही, अशी तक्रार केल्यानंतर महसूल निरीक्षक अमित गंथडे यांना बैठकीत उभे करून आयुक्त शुभा बी. यांनी कान पिचक्या दिल्या. तुम्हाला प्रशिक्षण देण्याची गरज आहे का? तसे असल्यास सांगा प्रशिक्षण देऊ. प्रत्येक कार्यालयात डाटा एंट्री ऑपरेटरदेखील दिला आहे. आणखी काय हवे आहे सांगा, ते देखील देऊ मात्र लोकांची कामे वेळेत पूर्ण करा. दर शनिवारी बैठक घेऊन तुम्हाला सांगितले जात असले तरी त्याचा कामावर कोणताही परिणाम होताना दिसत नाही. एखादी फाईल गहाळ झाल्यास त्याला बिल कलेक्टर जबाबदार राहील, अशा घटना वारंवार घडत असल्याने काही फाईल्स मी स्वत: हाताळल्या आहेत. प्रत्येक कार्यालयात रजिस्टर बुक असले पाहिजे, असे मनपा आयुक्तांनी सुनावले.
जाणूनबुजून फाईलमध्ये चुका
महापौर मंगेश पवार यांनी काही अधिकारी जाणूनबुजून फाईलमध्ये चुका करत आहेत. चुकीची दुरुस्ती करून घेण्यासाठी गेले असता संबंधित मिळकतधारांकडून पैशाची मागणी केली जाते. त्यामुळे फॉर्म भरतानाच तो व्यवस्थित भरावा, चुकीचा फॉर्म भरल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी सूचना केली. बहुतांश नगरसेवकांनी महसूल अधिकाऱ्यांवर तक्रारींचा भडिमार केल्याने मनपा आयुक्त शुभा बी. यांनी कोणीही तक्रार करण्यास पुढे येत नाही. तक्रार करा, संबंधितांवर निश्चित कारवाई केली जाईल, असे यावेळी स्पष्ट केले.









