शहापूर, जुने बेळगाव, वडगावच्या शेतकऱ्यांचा धनगरांना इशारा : 5 रोजी पुन्हा बैठक
बेळगाव : शहापूर, जुने बेळगाव व वडगाव येथील शेतकऱ्यांना धनगरांकडून मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पिकामध्ये बकरी सोडली जात असल्याने शेतीचे नुकसान होत आहे. धनगरांनी आपली बकरी शिवारामध्ये घालण्याचे त्वरित न थांबवल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सोमवारी आयोजित शेतकऱ्यांच्या बैठकीत देण्यात आला. वडगाव येथील ज्ञानेश्वर मंदिर येथे शेतकऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. सध्या शिवारात रब्बी पिकांमध्ये मसूर, वाटाणा, मोहरी, जोंधळा यासह इतर पिके घेण्यात येत आहेत. परंतु, दुपारी व रात्रीच्या वेळी शेतात कोणी नसलेले पाहून धनगर बकऱ्यांचे कळप शेतामध्ये घालत आहेत. यामुळे ऐन बहराला आलेली पिके फस्त होत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. याबाबत विचारणा केली असता त्यांच्यावरच अरेरावीचे प्रयत्न होत असल्याने बैठकीत नाराजी व्यक्त केली.
उद्या धनगरांसोबत बैठक
बेळगाव परिसरातील धनगरांसोबत बुधवार दि. 5 रोजी सायंकाळी 5 वाजता ज्ञानेश्वर मंदिर वडगाव येथे शेतकऱ्यांची बैठक होणार आहे. यावेळी धनगरांना इशारा देण्यात येणार आहे. त्यानंतरही हे प्रकार सुरूच राहिल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी अमोल देसाई, कुमार कुलकर्णी, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, शांताराम पाटील, शशिकांत पाटील, विनायक पाटील, पप्पू मण्णूरकर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.









