शहराच्या मध्यवर्ती भागात 3 कोटींची थकबाकी : हेस्कॉमकडून इशारा
बेळगाव : बेळगाव शहरात वीज बिलाची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. केवळ शहराच्या मध्यवर्ती भागात 3 कोटींपेक्षा अधिक थकबाकी असल्यामुळे हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांना वसुलीसाठी तगादा लावण्यात आला आहे. यामुळे ज्या घरगुती अथवा व्यावसायिक ग्राहकांची थकबाकी आहे, त्यांचे कनेक्शन तोडण्याचा इशारा हेस्कॉमकडून देण्यात आला असून या संदर्भातील कारवाई करण्यात येत आहे. गृहज्योती योजनेमुळे घरगुती ग्राहकांना 200 युनिटपर्यंत सरासरी वीज बिल मोफत करण्यात आले आहे. राज्यात आलेल्या नव्या सरकारने या येजनेची अंमलबजावणी केली, परंतु त्यापूर्वीची थकबाकी आहे तशीच आहे. ग्राहक बिल भरण्यास तयार नसल्याने हेस्कॉम कर्मचाऱ्यांसमोर समस्या उभी रहात
आहे. कारवाई करण्यास गेल्यानंतर बिल भरण्याऐवजी परिसरातील नगरसेवक अथवा लोकप्रतिनिधीला संपर्क साधून कर्मचाऱ्यांनाच दमदाटी करण्याचा प्रयत्न अनेक ठिकाणी सुरू आहे.शहर उपविभाग 1 अंतर्गत येणाऱ्या शहराच्या मध्यवर्ती भागात 3 कोटींपेक्षा अधिक रकमेची थकबाकी आहे. यामध्ये घरगुतीसह व्यावसायिक ग्राहकांचा समावेश आहे. हेस्कॉमच्या हुबळी येथील व्यवस्थापकीय संचालकांनी मागील आठवड्यात सुवर्णसौध येथे बैठक घेऊन थकबाकी वेळेत जमा करण्याबाबत सूचना केली. तसेच ज्यांची थकबाकी अधिक राहील, त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. विजेचा वापर करून देखील बिल भरले जात नसल्याने कर्मचारी वैतागले आहेत. एकीकडे अधिकाऱ्यांकडून वसुलीसाठी तगादा लावला जात असल्याने दुसरीकडे ग्राहकांसोबत वादावादी होत असल्याने कर्मचारी संतापले आहेत. यापुढे थकबाकी असणाऱ्या वीज ग्राहकांचे कनेक्शन तोडण्याचा इशारा हेस्कॉमकडून देण्यात आला आहे.
थकीत वीज बिल वेळेत भरणे गरजेचे
शहरात विजेची थकबाकी वाढली असल्याने वसुलीसाठी मोहीम आखण्यात आली आहे. हेस्कॉमच्या व्यवस्थापकीय संचालकांनी काही दिवसांपूर्वीच या संदर्भात सूचना केल्या आहेत. नागरिकांनी आपले थकीत वीज बिल वेळेत भरणे गरजेचे आहे.
– मनोहर सुतार (कार्यकारी अभियंता)









