खरीप हंगामावर कृषी खात्याच्या भरारी पथकाची नजर : गैरप्रकार आढळल्यास परवाना रद्द करण्याचा इशारा
बेळगाव : मान्सूनला प्रारंभ होत असल्याने पेरणी कामांना वेग येणार आहे. दरम्यान बी-बियाणे, खते आणि कीटकनाशकांची मागणी वाढणार आहे. अशावेळी बी-बियाणे आणि खते अधिक दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कृषी खात्याची नजर राहणार आहे. दरम्यान, विक्रीत गैरप्रकार आढळल्यास परवाना रद्द केला जाणार आहे, अशी माहिती कृषी खात्याने दिली आहे. जिल्ह्यात 7.10 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र वळीव आणि मान्सून लांबल्याने पेरणी रखडली होती. मात्र आता दोन दिवसांत ढगाळ वातावरण निर्माण होऊन मान्सून सक्रिय होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे बळीराजा पेरणीसाठी सज्ज झाला आहे. दरम्यान, बी-बियाणे आणि खताच्या मागणीत वाढ होणार आहे. या संधीचा फायदा घेऊन विक्रेते अधिक दराने बी-बियाणे विक्री करण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी खताचा कृत्रिम तुटवडा दाखविला जाणार आहे. अशांवर कृषी खात्याची नजर राहणार आहे. ठरलेल्या किमतीपेक्षा अधिक दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई केली जाणार आहे. मान्सून सक्रिय होऊ लागला आहे. त्यामुळे भात, सोयाबीन, सूर्यफूल, भुईमूग, ज्वारी, चवळी, कापूस आदी पिकांची पेरणी व लागवड होणार आहे. या बियाणांची विक्री करताना गैरप्रकार आढळल्यास कृषीखाते कारवाई करणार आहेत. हंगामाचा फायदा घेऊन बी-बियाणे खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला जातो. अशा गैरप्रकार करणाऱ्यांवरदेखील कृषी खाते कारवाई करणार आहे. जिल्ह्यात मुबलक प्रमाणात बी-बियाणे उपलब्ध करण्यात आली आहेत. मात्र काही खासगी कृषी सेवा केंद्रे अधिक दराने बी-बियाणांची विक्री करतात. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होते. हे टाळण्यासाठी कृषी खात्याचे भरारी पथकदेखील सज्ज झाले आहे. हंगामाला जोर येताच कृषी खात्याचे भरारी पथक विविध ठिकाणी भेट देणार आहे.
जादा दराने बियाणांची विक्री केल्यास संपर्क साधा
जिल्ह्यात सर्वत्र बी-बियाणे आणि खताचा पुरवठा करण्यात आला आहे. रयत संपर्क केंद्र आणि कृषी पत्तीन संघामध्ये बियाणे उपलब्ध आहेत. मात्र काही ठिकाणी जादा दराने बियाणांची विक्री केली जाते, असे प्रकार आढळल्यास जवळच्या रयत संपर्क केंद्र व कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
– राजशेखर विजापूर (सहसंचालक, कृषी खाते)









