आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळय़ात इशारा
पणजी /प्रतिनिधी
‘निपुण भारत’ मोहिमेच्या माध्यमातून मूलभूत साक्षरता व मूल्यांकन सुरु केले जाणार आहे. ‘कॉन्व्हे जिनिअस’ संस्थेमार्फत विद्या समीक्षा केंद्र सुरु केले जाणार असून तिथे सर्व शिक्षकांच्या कामाचे मूल्यांकन केले जाणार आहे. जे शिक्षक अधिकचे (रेमेडिअल) वर्ग घेणार नाहीत, अशा शिक्षकांवर तसेच शाळांवर कारवाई केली जाईल. आवश्यकता भासल्यास त्यांचे अनुदान बंद केले जाईल, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल मंगळवारी शिक्षण संचालनालयातर्फे इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळय़ात प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना दिला.
राज्यात न्याय वैद्यकशास्त्र, कायदा, समुद्र विज्ञानशास्त्र अशा राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. हॉस्पिटॅलिटीची आणखी एखादी संस्था लवकरच राज्यात स्थापन होईल. या पर्यायांची माहिती शिक्षकांकडे असणे आवश्यक आहे. तरच ते विद्यार्थ्यांना करिअरसाठी मार्ग सुचवू शकतात.
राज्य संशोधन केंद्राच्या माध्यमातून सरकार संशोधन क्षेत्रात काम करू इच्छिणाऱया विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देते आहे. मात्र त्यासाठी त्यांचा पाया पक्का होणे गरजेचे आहे. शिक्षकांनी यासाठी अथक परिश्रम घेतले पाहिजेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
रोबोटिक्समध्ये महत्वपूर्ण प्रगतीचे ध्येय
ऑक्टोबर महिन्यापासून कोडिंग रोबोटिक उपकरणे देण्यात येतील. राज्यात 6 वी च्या वर्गापासून कोडिंग व रोबोटिक अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्यापासून विद्यार्थ्यांना संबंधित उपकरणे दिली जातील. येत्या पाच वर्षात राज्यात रोबोटिक्सच्या क्षेत्रात महत्वपूर्ण प्रगती करण्याचे ध्येय समोर ठेवून काम सुरु आहे.
सर्व शाळांना पुरविणार पायाभूत सुविधा
राज्यातील सर्व सरकारी व अनुदानित शाळांमध्ये पायाभूत सुविधा व मनुष्यबळ आहे. काही मोजक्मया शाळांमध्ये कमतरता आहे, तिथे लवकरच सुविधा पुरवणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 1 ली ते 4 थीच्या वर्गाना प्रत्येकी एक शिक्षक देण्याचा प्रयत्न सुरु आहे, असेही ते म्हणाले.
शिक्षक हा प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्वाचे कार्य करत असतो. पालकांनंतर पिढी घडविण्याचे काम ते करतात. असे शिक्षण सचिव आयएएस रवी धवन यावेळी म्हणाले.
पुरस्कारप्राप्त शिक्षिका सरोजिनी गावस, डायगो पिंटो यांनी मनोगते व्यक्त केली. गणपतराव के. राणे, देविदास कोटकर, मारियो रूबेन कॉस्ता यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. सत्तरी, मुरगाव व काणकोण तालुक्मयातील भाग शिक्षण अधिकाऱयांना सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी गौरविण्यात आले.
पुरस्काराच्या रकमेतून कल्पक शिक्षकांचा करणार गौरव : जाण
आदर्श शिक्षक पुरस्कार स्वीकारल्यानंतर सुभाष जाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी पुरस्कार प्राप्त रकमेतील काही भाग हा कल्पक शिक्षकांचा गौरव करण्यासाठी वापरणार असल्याचे सांगितले. त्यांचे शिक्षण झाले त्या सुरश्री केसरबाई केरकर संस्थेच्या चार शाळांमधील शिक्षकांना दरवषी पुरस्कार देणार असल्याचेही ते म्हणाले.
तूरडाळ, साखर नासाडी प्रकरणी सर्व संबंधितांना निलंबित करणार : मुख्यमंत्री
याच कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी तूरडाळ नासाडी प्रकरणात आठजण जबाबदार असल्याचे आढळून आल्याने त्या सर्वांना निलंबित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. एवढेच नव्हे तर खराब करण्यात आलेल्या साखरीच्या प्रकरणाचीही फाईल दक्षता खात्याकडे सोपविली असून त्यांनी चौकशीही सुरु केली आहे. त्यातही जे दोषी आढळतील त्यांनाही निलंबित करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.









