बेकायदा शॅक्स लवकरच बंद करणार ; प्रदूषण नियंत्रण मंडळाची कोर्टास माहिती
पणजी : कळंगूट, कांदोळी पाठोपाठ आता हणजुणे समुद्रकिनारी अनेक शॅक्स आस्थापने प्रदूषण मंडळाच्या मान्यतेशिवाय चालू असल्याची माहिती मंडळातर्फे उच्च न्यायालयास सादर करण्यात आली आहे. त्या सर्वांना बंदीची नोटीस मंडळातमार्फत देण्यात येणार असल्याची ग्वाही मंडळाने न्यायालयासमोर दिली आहे. बेकायदा शॅक्स प्रकरणाची याचिका उच्च न्यायालयात सुनावणीस आली तेव्हा मंडळाने आपला अहवाल न्यायालयासमोर मांडला. तेथील 52 आस्थापनांची पाहणी करण्यात आली तेव्हा त्यापैकी फक्त 16 जणांकडेच मंडळाचा परवाना असल्याचे आढळून आले. उर्वरित 36 आस्थापने मंडळाचा परवाना न घेताच चालू असल्याचे दिसून आले. त्यात प्रामुख्याने शॅक्सचा भरणा जास्त असल्याची माहिती मंडळाने प्रतिज्ञापत्रातून दिली आहे. शिवाय 57 उद्योग आस्थापनांची पाहणी अद्याप बाकी असल्याचे मंडळाने नमूद केले आहे.
हणजुणेतील ‘ती’ आव्हाने फेटाळा
दरम्यान हणजुणे पंचायतीने 44 बेकायदा आस्थापने पाडण्याच्या जारी केलेल्या आदेशाला संबंधितांनी पंचायत संचालकांकडे आव्हान दिले होते. ते आव्हान फेटाळून लावण्याचे निर्देश न्यायालयाने पंचायत संचालकांना दिले आहेत.
बिनधास्तपणे चालतात बेकायदा व्यवसाय
बेकायदा शॅक्स प्रकरणातील याचिकेच्या सुनावणीतून समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर अनधिकृत शॅक्स व इतर उद्योग व्यवसाय, आस्थापने बिनधास्तपणे चालत असल्याचे समोर आले आहे. प्रदूषण मंडळाने नोटीस देऊनही ते सर्व चालूच ठेवण्यात येत असल्याचेही उघड झाले आहे. ते बंद करण्याचे निर्देशही शेवटी न्यायालयालाच द्यावे लागत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.









