9500 रुपयांचा दंड, मोहीम सुरूच राहणार
बेळगाव : बेळगाव शहर व उपनगरांत काळ्या काचांच्या कारगाड्यांवर कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांनी दोन दिवसांत 19 वाहनांवर कारवाई करून 9,500 रुपये दंड वसूल केला आहे. गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, वाहतूक विभागाचे एसीपी गंगाधर बी. एम. यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक दक्षिण व उत्तर विभागातील अधिकाऱ्यांनी बुधवार व गुरुवारी ही तपासणीची मोहीम राबविली. आपल्या कारना काळ्या फिल्म लावणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
दोन दिवसांत 19 वाहनांवर कारवाई
वाहतूक उत्तर पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 10 व दक्षिण पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 9 अशा एकूण 19 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून तपासणी मोहीम सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्तांनी सांगितले.









