भूगर्भ खात्याच्या अधिकाऱयांकडून आमटे परिसरात प्रत्यक्ष पाहणी : शासकीय नियम धाब्यावर, लवकरच अहवाल वरीष्ठांकडे
खानापूर : तालुक्मयातील आमटे येथे सुरू असलेल्या अवैध खनिज उत्खननाबाबत भूगर्भ खात्याने कठोर कारवाई करण्यासाठी पाऊल उचलले आहे. काही दिवसांपासून शासकीय नियम धाब्यावर बसवून उत्खनन करण्यात येत होते. याबाबत तरुण भारतने याचा सातत्याने पाठपुरावा केला होता. याची दखल घेऊन जिल्हा भूगर्भ खात्यातील खानापूरचे निरीक्षक विनायक लोहार, महसूल अधिकारी फडके व तलाठी यांनी मंगळवारी आमटे परिसरात प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी मंगळवारी याबाबत लोहार, फडके, तलाठी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. याबाबतचा अहवाल लवकरच वरि÷ांकडे देणार असल्याचे विनायक लोहार यांनी सांगितले.
तालुक्मयात फक्त दोन शेतकऱयांना शेतजमिनीचे सपाटीकरण करण्याची परवानगी आहे. उर्वरितांच्या मुदती संपलेल्या आहेत. मात्र येथून मोठय़ा प्रमाणात खनिज वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्याने अधिकाऱयांनी प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल देण्याचे आदेश दिले होते. ज्यांनी आदेशाचे उल्लंघन केले आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई होणार असल्याचेही लोहार यांनी सांगितले. तसेच पुढील दोन-तीन दिवसांत या भागातील उत्खनन पूर्णपणे थांबविले जाईल, असेही ते म्हणाले. यापुढील काळात शेतकऱयांना सपाटीकरणासाठी महसूल खाते, कृषी खाते, वन खते यांचे ना हरकत पत्र जोडावे लागणार आहे. नुकत्याच झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले.
सपाटीकरणाच्या नावावर दिशाभूल
जमीन शेतीयोग्य करण्यासाठी परवाना घेऊन आमटे परिसरात मोठय़ा प्रमाणात यंत्रसामग्री वापरून उत्खनन करण्यात येत आहे. तसेच खनिजाची वाहतूक करण्यात येत आहे. हे सर्व खनिज उत्तम ग्रेडचे असल्याने याला बाजारात मोठा भाव असल्याने शासनाची दिशाभूल करून शेतकऱयांच्या सपाटीकरणाच्या परवान्याचा आधार घेत खनिजाचे उत्खनन करून मोठय़ा ट्रकमधून खनिजाची वाहतूक करण्यात येत आहे. याचा परिणाम पर्यावरणावर झालेला आहे. तसेच या भागातील ग्रामीण गावांना जोडणारे सर्व रस्ते उद्ध्वस्त झालेले आहेत. तसेच या उत्खननाचा परिणाम जंगलातील झाडांवर झालेला आहे. उत्खननाच्या कोणत्याच नियमावलीचे पालन केले नसल्याने परिसर भकास बनत आहे. ग्रामीण भागातील रस्ते निर्माण करण्यास अनेक अडचणी आहेत. तयार झालेले रस्ते या वाहतुकीमुर्ळे उद्ध्वस्त झालेले आहेत. यामुळे ग्रामीण भागात दळणवळण करणे फार जोखमीचे झालेले आहे. याबाबत अनेक ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. वनअधिकारी आम्हाला जंगलातील सुकलेले लाकूड आणताना किंवा शेतीसाठी माती काढली तर आमच्यावर कारवाई करतात. मात्र आमटे परिसरात यंत्रसामग्री लावून उत्खनन करून खनिज वाहतूक होत असताना त्यांच्यावर कारवाई का नाही? असा सवालही या भागातील शेतकऱयांतून उपस्थित होत आहे.
बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा
आमटे येथील ग्राम पंचायतीचे माजी अध्यक्ष लक्ष्मण कसर्लेकर यांनी बोलताना सांगितले की, माझ्या स्वतःच्या शेतातून रस्ता निर्माण करून खनिजाची वाहतूक करण्यात आली आहे. याबाबत मी वारंवार विरोध करूनही मलाच धमकाविण्यात येत आहे. जर आठ दिवसांत परिसरातील उत्खनन थांबविले नाही तर या परिसरातील शेतकऱयांना तसेच पर्यावरणवाद्यांना घेऊन खानापूर तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी तरुण भारतशी बोलताना दिला.









