पर्यटकांची चाललेली लूट खपवून घेणार नाही
पणजी : गोवा राज्य पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे असल्याने या ठिकाणी देश-विदेशांतील पर्यटक मोठ्या संख्येने येतात. परंतु राज्याच्या किनारी भागात आता बोगस डेंटिस्ट डॉक्टरांचा सुळसुळाट वाढल्याच्या बातम्या आपल्या कानावर येत आहेत. त्यामुळे जर पर्यटकांकडून दंत तपासणीच्या नावावर फसवणूक होत असल्यास आपण गप्प बसणार नाही. परप्रांतीय बोगस डेंटिस्ट डॉक्टरांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.
अखिल भारतीय दंत चिकित्सक संघटनेच्या गोवा शाखेच्या 18 व्या परिषदेत ते बोलत होते. हा कार्यक्रम पणजीतील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये घेण्यात आला. मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, बोगस दंत चिकित्सांकडून विदेशी पर्यटकांची लूट चालली असल्याचे आपल्या कानावर आले आहे. याबाबत आपल्याकडे रितसर लेखी तक्रार आल्यास आपण बोगस डॉक्टरांवर कारवाई करणार आहे. गोव्याचे पर्यटन हे आता ‘सन, सॅण्ड अँड सी’ या पुरतेच मर्यादित राहिलेले नाही. वैद्यकीय पर्यटनाच्या दृष्टीकोनातूनही सरकार विचार करीत आहे. वैद्यकीय पर्यटनाला गोव्यात वाव असल्याने याचा फायदा घेऊन काही बोगस, परप्रांतीय डॉक्टर गोव्यात वावरत आहेत. अशा बोगस डॉक्टरांकडून किनारी भागात दंत तपासणी ऊग्णालये थाटल्याचे आपल्या कानी आले असल्याचेही ते म्हणाले.
महिला दंत चिकित्सकांचे कौतुक
संपूर्ण जगात कोविड संकटाने थैमान घातल्यानंतरही गोव्यातील दंत चिकित्सकांनी पीपीई किट वापरून शस्त्रक्रिया केल्या. कोविड संकट काळात राज्यातील दंत चिकित्सकांना मोठी झळ बसली. सरकार दंत चिकित्सकांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यास तयार आहे. दंत महाविद्यालयात अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या दंत चिकित्सकांमध्ये 70 ते 80 टक्के ह्या महिला असल्याने त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.









