वृत्तसंस्था / श्रीनगर
केंद्रीय राखीव पोलिस दलात कॉन्स्टेबल या पदावर असलेल्या मुनिर अहमद याच्यावर दलाकडून कठोर कारवाई केली जाणार आहे. अहमद याने आपल्या संस्थेची अनुमती न घेता, एका पाकिस्तानी महिलेशी लग्न केल्याचा आरोप आहे. याखेरीज अहमद याच्या वागणुकीत अनेक त्रुटी आढळल्या आहेत. त्याच्याकडून वारंवर शिस्तभंग झाला आहे, असे दलाच्या वक्तव्यात स्पष्ट करण्यात आले आहे.
अहमद याची पाकिस्तानी पत्नी तिच्या व्हिसाचा कालावधी संपल्यावरही भारतात वास्तव्य करीत आहे. या घटनेची माहिती त्याने आपल्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना दिलेली नाही. त्याने पाकिस्तानी महिलेशी विवाह करण्यासंबंधी अनुमतीचा अर्ज केला होता. तथापि या अर्जावर निर्णय होण्याच्या आतच त्याने विवाह केल्याने त्याने मोठा नियमभंग केला आहे. सध्याच्या परिस्थितीत तर त्याची ही कृती अत्यंत आक्षेपार्ह ठरते. आता त्याच्यावर विश्वास ठेवल्यास तो देशाच्या सुरक्षेला धोका ठरु शकतो, अशी माहिती सीआरपीएफच्या मुख्यालयाने दिली आहे.









