पोलीस आयुक्तांनी दिली माहिती
बेळगाव : गेल्या काही महिन्यांत संतिबस्तवाड येथे घडलेल्या संपूर्ण घटनांची चौकशी करण्यात येत असून या घटना हाताळण्यात दुर्लक्ष केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी दिली. संतिबस्तवाड येथील एका मुलीच्या बेपत्ता प्रकरणानंतर गावात अशा घटना घडल्याचेही त्यांनी सांगितले. पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ हे उपस्थित होते. चार दिवसांपूर्वी संतिबस्तवाड येथे घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करण्यात येत आहे. शुक्रवारी निदर्शने होऊ नयेत यासाठी आपण बैठक घेऊन चर्चा केली आहे. कोणीही निदर्शने करू नये, असे आवाहन करतानाच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तीन हजार पोलीस तैनात करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.
याचवेळी आमदार राजू सेठ यांनीही संतिबस्तवाड येथील घटनेसंबंधी पत्रकारांशी संवाद साधला. ही घटना दु:खदायक आहे. तीन दिवसात अटकेची ग्वाही दिली होती. पोलिसांनी आणखी मुदत मागितली आहे. पोलीस आयुक्तांसह सारेच अधिकारी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पाठपुरावा करीत आहेत. प्रामाणिकपणे काम करीत आहेत. तरीही निदर्शने करणे आमचा हक्क आहे. समाजाबरोबर आपण आहोत. ही घटना कोणालाच रुचली नाही. अनेक हिंदू बांधवांनी आपल्याजवळ नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांशीही आपण यासंबंधी चर्चा केली आहे. दबाव आहे म्हणून निरपराध्यांना या प्रकरणात अडकू नये. जे खरे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशा घटना घडू नये, असेही आमदारांनी सांगितले. पत्रकार परिषदेपूर्वी पोलीस आयुक्त कार्यालयात आमदार राजू सेठ व यडा मार्टिन मार्बन्यांग यांची चर्चा झाली.









