खासदार सदानंद तानावडे यांनी व्यक्त केला अंदाज
पणजी : एसटी राखिवता विधेयक मंजूर होऊन त्यास राष्ट्रपतींचीही मान्यता मिळाली आहे. आता पुढील काम निवडणूक आयोगाचे आहे. त्यांनी वेळेत सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यास येत्या विधानसभा निवडणुकीत त्याची कार्यवाही सुद्धा होऊ शकते, असा अंदाज खासदार सदानंद तानावडे यांनी व्यक्त केला. शुक्रवारी पणजीत भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष तथा माजी सभापती विश्वास सतरकर आणि उत्तर जिल्हा पंचायत अध्यक्ष धाकू मडकईकर यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना तानावडे यांनी, नुकत्याच पार पडलेल्या गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय चर्चेवरील अधिवेशनात आणि त्याच दरम्यान झालेल्या लोकसभा अधिवेशनात घेण्यात आलेल्या अनेक विविध लोकहितकारी निर्णयांचा आढावा घेतला.
गोवा सरकारने घेतलेला एक मोठा निर्णय म्हणजे ‘म्हजे घर’ योजनेंतर्गत अनेक लोकांना लाभकारी ठरला आहे. घरांच्या दुऊस्तीपासून विभाजनापर्यत यासारख्या अनेक प्रक्रिया सहजतेने करणे शक्य झाले आहे. त्याशिवाय 1972 पूर्वी सरकारी किंवा कोमुनिदाद जमिनीत तसेच बेकायदेशीररित्या बांधण्यात आलेल्या किंवा 20 कलमी कार्यक्रमांतर्गत प्राप्त झालेल्या घरांनाही कायदेशीर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. तसेच गेल्या कित्येक वर्षांपासून रोजंदारीवर काम करणाऱ्या शेकडो कामगारांना पगारवाढीसह तात्पुरता दर्जा देण्यात आला. त्यासाठी सरकारचे आपण अभिनंदन करतो, असे ते म्हणाले.
संसदीय अधिवेशनात काँग्रेसकडून केवळ गोंधळ घालणे आणि बहिष्कार घालणे व त्यायोगे कामकाज संस्थगित करण्याचे प्रयत्न करणे एवढेच काम करण्यात आले. तरीही संपूर्ण अधिवेशनात अनेक विधेयके मंजूर करण्यात आली. त्यात आपण एकूण 331 प्रश्न मांडले. त्यातील 61 प्रश्नांची उत्तरे मिळाली, तसेच 15 विधेयके मंजूरही झाली, त्यात प्रामुख्याने लँडिंग बील, समुद्रातून वस्तुंची वाहतूक, वनिरी जहाज वाहतूक, मणिपूर वस्तू आणि सेवा कर, गोवा राज्यात अनुसूचित जमाती प्रतिनिधीत्वाचे पुनर्समायोजन, व्यापारी शिपिंग, राष्ट्रीय क्रीडा प्रशासन, राष्ट्रीय उद्रोजक द्रव्य प्रतिबंधक (सुधारणा), उत्पन्न कर, कर आकारणी कायदे, भारतीय बंदरे, खाणी आणि खनिजे (विकास आणि नियमन), भारतीय व्यवस्थापन संस्था (सुधारणा), ऑनलाईन गेमिंग, यासारख्या विधेयकांचा समावेश होता, अशी माहिती तानावडे यांनी दिली. या अधिवेशनात अनुसूचित जमाती विधेयकावर विचार मांडण्याची संधी प्राप्त झाली, हे आपले भाग्य समजतो, असेही ते म्हणाले.









