खडेबाजार रस्ता अतिक्रमणमुक्त करण्यासाठी उपक्रम
प्रतिनिधी / बेळगाव
मध्यवर्ती बसस्थानक परिसर आणि खडेबाजार रोड अतिक्रमणमुक्त करण्यासाठी रहदारी पोलीस खाते आणि महापालिकेने दोन दिवसांपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. गुरुवारी तिसऱ्या दिवशीदेखील बसस्थानक आणि खडेबाजार परिसरात रस्त्यावर ठाण मांडलेल्या व्यावसायिकांना हटविण्याचा बडगा उगारण्यात आला. सूचना करूनही रस्त्यावर व्यवसाय थाटलेल्या व्यावसायिकांचे साहित्य जप्त करण्याची कारवाई केली.
खडेबाजार रस्त्यावर फेरीवाले व बैठ्या व्यापाऱ्यांची संख्या वाढली आहे. मध्यवर्ती बसस्थानकाचा परिसर व्यावसायिकांनी व्यापला असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. खडेबाजारमधून दुचाकी वाहनधारकांना ये-जा करणे कठीण बनले आहे. या रस्त्यावरून पायी चालत जाणाऱ्या पादचाऱ्यांनादेखील रस्ता मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ये-जा करताना व्यावसायिकांना धक्का लागल्यास वादावादीचे प्रसंगही उद्भवत आहेत. या रस्त्यावर व्यावसायिकांची संख्या वाढल्याने अतिक्रमणमुक्त रस्ता बनविण्यासाठी रहदारी पोलीस आणि महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. मागील दोन दिवसांपासून अतिक्रमणे, दुकानांसमोरील जम्प्स् हटवून बैठ्या व्यापाऱ्यांना बाजूला बसण्याची सूचना देण्यात येत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने सूचना करूनदेखील काही व्यावसायिकांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे साहित्य जप्त करण्याची कारवाई गुरुवारी करण्यात आली. मध्यवर्ती बसस्थानकासह खडेबाजार परिसरात फेरफटका मारून रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या व्यावसायिकांच्या हातगाड्या तसेच छत्र्या व इतर साहित्य जप्त करण्यात आले. यावेळी रहदारी पोलीस खात्याचे अधिकारी व महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथक कारवाईच्या मोहिमेत सहभागी झाले होते.









