हातकणंगले तहसीलदारांची थेट करवाई
कोल्हापूर
अनाधिकृत गौण खनिज आणि दगड वाहतूक करणाऱ्या डंपरवर हातकणंगले तहसीलदार सुनील बेल्हेकर यांनी थेट कारवाई केली. या कारवाई मुळे दिवसभर अनाधिकृत दगड वाहतूक थांबली होती.
चार दिवसांपूर्वी टोप कासारवाडी येथील क्रशर ट्रेडिंग कंपन्यांवर कारवाई करण्यात आली होती. पण ही कारवाई संथ होताच पुन्हा अवैध गौण खनिज आणि विनापरवाना दगड वाहतूक सुरू झाली होती. त्यामुळे हातकणंगले तहसीलदार सुशिल बेल्हेकर यांनी मंगळवारी सकाळी स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पाहणी दरम्यान दगड व इतर साहित्य घेवून जाणाऱ्या गाड्या, डंपरना तहसीलदार बेल्हेकर यांनी अडविले. डंपर चालकांकडे गाडीत भरलेले गौण खनिज दगडा बाबत रितसर परवाना, पावतीची चौकशी केली असता, गाडीत क्षमतेपेक्षा जास्त अनाधिकृत गौण खनिज दगड भरुन जाणारे तीन गाड्या तहसीलदार यांनी पकडल्या आणि थेट कारवाई केली. सदरच्या गाड्या टोप, सांगली आणि कोल्हापूर येथील असल्याचे टोप येथील तलाठी सुनिल बाजारी यांनी सांगितले.या तिन्ही गाड्यांवर कारवाई करुन या गाड्या तहसील कार्यालय हातकणंगले येथे लावण्यात आल्या आहेत.
शिये फाटा येथे हातकणंगले तहसीलदार सुनील बेल्हेकर यांनी अनाधिकृत गौण खनिज आणि दगड वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई केल्याचे क्रशर आणि खाण व्यवसायिकांना समजताच एकच धावपळ उडाली. तहसीलदार पाहणीसाठी दगड खाणीत येतील, म्हणून दगड खाणीतील जेसीबी, पोकलॅंन्ड, दगडाने भरलेले डंपर खाणीतून बाहेर काढून अज्ञात ठिकाणी उभे करण्यात आले होते. दिवसभर टोप शिये परिसरातील क्रशर आणि दगड खाण व्यवसायिकांमध्ये तहसीलदार यांच्या कारवाईची चर्चा रंगली होती. ही कारवाई तहसीलदार सुनील बेल्हेकर, मंडलाधिकारी सिमा मोरये, टोप तलाठी सुनील बाजारी, कोतवाल रणजित कांबळे यांनी केली.
Previous Articleमराठा संस्कृती संवर्धन संघटनेच्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद
Next Article सुरेल मैफलीने रसिक स्वरवर्षावात चिंब








