म्हसवड :
हिंगणी येथे दारू विक्री करणाऱ्या संशयित इसमांचा पाठलाग करून अवैध दारूसाठा व विक्री करणारे दोघांना ताब्यात घेण्यात म्हसवड पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हिंगणी (ता. माण) गावच्या हद्दीत तातोबा लक्ष्मण सरतापे हा ताडी व हातभट्टी दारूची निर्मिती करून विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याच्या राहत्या घराच्या आडोशाला छापा टाकून त्याच्याकडून ताडी आणि हातभट्टी दारू जप्त केली आहे.
तसेच पेट्रोलिंग दरम्यान एक संशयित इसम दुचाकीवरून दहिवडी ते म्हसवड रोडवरून बेकायदा बिगरपरवाना देशी-विदेशी दारूची वाहतूक करत होता. त्याच्यावर संशय आल्याने त्याला थांबण्याचा इशारा करून देखील तो न थांबल्याने अधिक संशय बळावला. पोलिसांनी त्याचा जवळपास पाच किलोमीटर पाठलाग करून पकडले. त्याने त्याचे नाव पोपट पांडुरंग शिंदे (रा. पानवण, ता. माण) असे सांगितले. त्याच्याकडे असलेल्या पोत्याची पाहणी केली असता त्यामध्ये देशी-विदेशी दारू आढळली. सुमारे लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही संशयितांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमर नारनवर, मैना डांगे, सुरेश डांगे, नितीन निकम, संजय आस्वले, अनिल वाघमोडे, नवनाथ शिरकुळे, वसीम मुलाणी, संतोष काळे यांनी ही कारवाई केली.








