पुणे / प्रतिनिधी :
सरकारी रेशनिंगचा तांदूळ बॅगमध्ये भरून तो छुप्या पध्दतीने खुल्या बाजार विक्री करत असलेल्या टोळीच्या खंडणी विरोधी पथक 1 ने मुस्क्या आवळल्या. याप्रकरणी पाच जणांविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमवाडी येथील एका गोडाऊनवर छापा टाकून केलेल्या कारवाईत हा काळाबाजार उघडकीस आला.
वाहन चालक संतोषकुमार जयहिंद मोरे, प्रेमचंद जैन, श्रीमती संतोषी रुपचंद सोलंकी, प्रकाश रुपचंद सोळंकी व प्रमोद रुपचंद सोलंकी असे गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. पांढऱ्या रंगाचा टाटा टेम्पोमधील सरकारी रेशनिंगचा तांदुळ हा संगमवाडी येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये उतरविला जातो. त्याठिकाणी पॉलिथीनच्या बॅगमध्ये भरून तो छुप्या पध्दतीने खुल्या बाजारात बेकायदेशीर विक्री करत असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अजय वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील, उपनिरीक्षक विकास जाधव, पोलीस अंमलदार प्रमोद सोनावणे, सयाजी चव्हाण, नितीन कांबळे, किरण ठवरे, दुर्योधन गुरव, अमोल आवाड, विजय कांबळे, राजेंद्र लांडगे यांनी संगमवाडी येथील गोडाऊनवर छापा टाकला. त्यावेळी तांदळांच्या पोत्यांनी भरलेला एक टाटा टेम्पो मिळून आला.
अधिक वाचा : मंत्रीपदी महिला नेत्याची वर्णी, शंभुराज देसाईंनी दिले संकेत
टेम्पो चालक संतोषकुमार मोरे याच्याकडे अधिक चौकशी केली असता, खडकी येथील पद्मावती फाउंडेशनचे मालक प्रेमचंद जैन यांच्या सांगणेवरून रेशनिंगचा तांदुळ संतोषी रुपचंद सोलंकी, प्रकाश रुपचंद सोळंकी आणि प्रमोद रुपचंद सोलंकी गोडाऊनवर घेवून आलो. टेम्पोमध्ये अवैधरित्या विक्रीसाठी आणलेला 152 क्विंटल तांदुळ मिळून आला. त्यानंतर गोडाउन चेक केले असता, त्यामध्ये 160 क्विंटलचा तांदुळ आणि 57.5 क्विंटल गहू यासह अन्य धान्य असे एकूण 17 लाख 41 हजारांचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील हे करीत आहेत.









