संबंधित युट्यूब चॅनल्सचे 2.3 कोटी सब्सक्रायबर्स
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
बनावट वृत्त फैलावणाऱ्या 8 युट्यूब चॅनल्ससंबंधी माहिती मिळाली आहे. हे युट्यूब चॅनल्स भारतीय सैन्य, शासकीय योजना, लोकसभा निवडणूक आणि अनेक अन्य गंभीर मुद्द्यांवर खोटी माहिती पसरवित होते. या चॅनल्सचे एकूण 2.3 कोटी सब्सक्रायबर्स असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.
‘यहां सच देखो’, ‘कॅपिटल टीव्ही’, ‘केपीएस न्यूज’, ‘सरकार व्लॉग’, ‘अर्न टेक इंडिया’, ‘एसपीएन 9 न्यूज’, ‘एज्युकेशनल दोस्त’, ‘वर्ल्ड बेस्ट न्यूज’ अशी या चॅनल्सची नावे आहेत. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने या युट्यूब चॅनल्सवर फेक न्यूजचा फॅक्ट चेक केला आहे.
एसपीएन 9 न्यूज या युट्यूब चॅनल्सचे 48 लाख सब्सक्रायबर्स आणि 189 कोटी ह्यूज आहेत. या चॅनेलकडून राष्ट्रपती, पंतप्रधान आणि अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या विरोधात बनावट वृत्त फैलावली जात होती. सरकारी व्लॉग या युट्यूब चॅनेलवर 45 लाख सब्सक्रायबर्स अन् 9.4 कोटी ह्यूज आहेत. त्याच्याकडून शासकीय योजनांविषयी खोटी माहिती फैलावली जात होती.
एज्युकेशन दोस्त या युट्यूब चॅनेलचे 34.3 लाख सब्सक्रायबर्स असून 23 कोटी ह्यूज आहेत. हे चॅनेल शासकीय योजनांविषयी भ्रामक माहिती पसरवित होते. कॅपिटल टीव्ही या युट्यूब चॅनेलचे 35 लाख सब्सक्रायबर्स असून 160 कोटी व्ह्dयूज आहेत. त्याच्याकडून पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची घोषणा झाल्याचे खोटे वृत्त पसरविण्यात येत होते.
यहां सच देखो या युट्यूब चॅनेलचे 30 लाख सब्सक्रायबर्स असून निवडणूक आयोग आणि सरन्यायाधीशांविषयी त्यावर खोटी माहिती प्रसारित करण्यात आली. वर्ल्ड बेस्ट न्यूज नावाच्या युट्यूब चॅनेलने भारतीय सैन्याविषयी खोटी बातमी प्रसारित केली होती.
केपीएस न्यूज या युट्यूब चॅनेलकडून शासकीय योजना अन् आदेशांसंबंधी खोटी माहिती देण्यात आली होती. गॅस सिलिंडर 20 रुपयांमध्ये मिळतोय आणि पेट्रोलचा दर 15 रुपये प्रतिलिटर झाल्याचे खोटे वृत्त या युट्यूब चॅनेलकडून प्रसारित करण्यात आले होते.









