सिंधुदुर्गनगरी :
मालवाहतूक करणाऱ्या 20 खासगी बसेसवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामार्फत कारवाई करण्यात आली आहे. त्यांना 2 लाख 10 हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे, अशी माहिती सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी दिली आहे.
गोवा ते मुंबई किंवा पुणे येथे प्रवासी घेऊन जाणाऱ्या खासगी बसेसमधून मालवाहतूक केली जाते, अशा अनेक तक्रारी आल्या होत्या. विशेषत: सध्या आंबा सिझन असल्याने आंबा पेट्या मोठ्या प्रमाणात खासगी बसमधून नेल्या जात असल्याने उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पथकामार्फत ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये अतुल चव्हाण, विनोद भोपळे, श्री. ढोबळे, श्री. भोसले या मोटर वाहन निरीक्षकांनी भाग घेतला होता.
इन्सुली चेकपोस्ट व ओसरगाव टोलनाका येथे दि. 5 व 6 एप्रिल रोजी 91 खासगी बसेसची तपासणी करण्यात आली. त्यावेळे 20 बसमधून मालवाहतुक केली जात असल्याचे आढळले. या 20 बसेसवर कारवाई करून 2 लाख 10 हजार ऊपये दंड आकारण्यात आला आहे. ही कारवाई यापुढेसुद्धा सुरूच राहणार आहे, अशी माहिती सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी दिली आहे.








