पैंगीण ग्रामसभेत जोरदार मागणी, मोठ्या प्रमाणात डोंगरकापणी – वृक्षतोड, पंचायतीकडून कसलाच परवाना न घेता कामे : सरपंच
काणकोण : पैंगीण पंचायतीमधील सादोळशे वॉर्डातील ओपे या जमिनीत ‘स्वामीजीस निकेतन’ या नावाखाली राजभूषण पांड्यो या परप्रांतीय व्यक्तीने मोठ्या प्रमाणात डोंगरकापणी आणि वृक्षतोड केलेली असून स्थानिक पंचायतीकडून यासंबंधी कसल्याच प्रकारचा परवाना घेण्यात आलेला नाही. यासंदर्भात केलेल्या लेखी सूचनांनाही व्यवस्थित उत्तरे दिली जात नाहीत, असा आरोप पैंगीण पंचायतीच्या सरपंच सविता तवडकर यांनी पैंगीणच्या ग्रामसभेत केला. त्यानंतर या प्रकरणी तक्रार नोंदविण्यात यावी तसेच कारवाई करावी, अशी जोरदार मागणी ग्रामसभेने केली. सादोळशे वॉर्डाच्या पंच शिल्पा प्रभुगावकर यांनी यासंबंधीची माहिती दिल्यानंतर सरपंच, अन्य पंच आणि पंचायत सचिव यांनी त्या जागेची पाहणी केली. यावेळी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली असून डोंगर कापून रस्ता तयार करण्यात आला असल्याचे निदर्शनास आल्याचे सरपंच तवडकर यांनी स्पष्ट केले. मूळ कोसंबे यांच्या मालकीची अंदाजे 1 लाख 30 हजार चौ. मी इतकी जमीन सदर व्यक्तीने विकत घेतल्यानंतर त्या ठिकाणी बांधकामाला प्रारंभ करतेवेळी पैंगीण पंचायतीचा ‘ना हरकत दाखला’ घेतला गेला नाही. यासंबंधी स्थानिक पंच तसेच अन्य संबंधितांशी साधी चर्चा करायची देखील त्यांची तयारी नाही. यासंबंधी गोव्यातील अतिमहनीय व्यक्तींशी आपली चर्चा झालेली असून त्यांच्याशी आपला संबंध आहे. त्यामुळे स्थानिक पंचायत मंडळाशी आपला कसलाच संबंध पोहोचत नाही, अशी वक्तव्ये सदर व्यक्ती करत असल्याचा दावा यावेळी माजी पंच विपीन प्रभुगावकर यांनी केला.
त्या संपूर्ण जागेवर मालकी सांगणाऱ्या बाबा ऋषिराज यांनी कायद्याचे उल्लंघन केलेले असेल आणि पंचायतीच्या लेखी निवेदनाला जर ते व्यवस्थित उत्तरे देत नसतील, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि सदर बांधकामाला वीज, पाण्याच्या जोडण्यांसाठी ‘ना हरकत दाखला’ देऊ नये, अशी जोरदार मागणी ग्रामसभेस उपस्थित नागरिकांनी केली. त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांसहित वनखाते आणि अन्य संबधित खात्यांकडे तक्रारी नोंदविण्यात याव्यात. गरज पडल्यास परवानगीविना दोन ठिकाणी तयार करण्यात आलेल्या रस्त्यांवर ख•s खोदून अडवणूक करण्यात यावी आणि बेकायदा बांधकामांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रदीप मोखर्डकर, दीपक नाईक, अजित पैंगीणकर आणि अन्य नागरिकांनी केली. या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सविता तवडकर या होत्या. उपसरपंच सुनील पैंगणकर, पंच महेश नाईक, सतीश पैंगीणकर, शिल्पा प्रभुगावकर, प्रवीर भंडारी, अस्मिता जोशी, जॉन बार्रेटो, रसिका वेळीप आणि पंचायत सचिव राजीव ना. गावकर हे उपस्थित होते. पंचायत सचिवाने मागील ग्रामसभेचे इतिवृत्त सादर केले. यावेळी झालेल्या चर्चेत गाळये येथील ग्रामीण आरोग्य केंद्रात अॅलोपॅथिक डॉक्टरची नेमणूक करण्यात यावी, तळपण येथील रस्त्यांच्या बाजूच्या गटारांची पावसाळ्यापूर्वी सफाई करण्यात यावी आणि चिपळे, गाळये या भागांत पिण्याच्या पाण्याची नीट सोय करावी, अशा मागण्या नागरिकांनी केल्या.









