रणवीर अलाहाबादिया संदर्भात सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला सूचना, मागितले उत्तर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
युट्यूब किंवा सोशल मीडियावर दाखविल्या जाणाऱ्या अश्लील दृष्यांसंदर्भात केंद्र सरकारने कारवाई करणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने यासंबंधीचे आपले उत्तर न्यायालयाला सादर करावे, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने रणवीर अलाहाबादिया प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केली आहे. अलाहाबादिया याच्यावर अश्लील पॉडकास्ट केल्याप्रकरणी कारवाई केली जात आहे. त्याने सर्वोच्च न्यायालयात या कारवाईविरोधात याचिका सादर केली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्र सरकारला ही सूचना केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अलाहाबादिया याच्याही पॉडकास्ट आशयावर कठोर ताशेर ओढले आहेत. हा सर्व आशय अत्यंत बिभत्स आहे. महिला, मुली आणि तरुणी पाहू किंवा ऐकू शकणार नाहीत, असा हा आशय आहे. अलाहाबादिया याने या पॉडकास्टमध्ये जी भाषा उपयोगात आणली आहे, ती अतिशय निषेधार्ह आणि घाणेरडी आहे. त्याने समंजसपणा दाखविण्याची आवश्यकता आहे आणि विधाने करताना जबाबदारीने केली पाहिजेत. त्याने समाजाला गृहित धरता कामा नये. आपल्याला काहीही बोलण्याचा अधिकार किंवा संमतीपत्र प्राप्त झाले आहे, अशा भावनेत त्याने राहू नये, असे न्या. सूर्यकांत यांनी त्याला सुनावले. तथापि, त्याला महत्त्वाचा दिलासाही दिला आहे.
अटकेपासून संरक्षण
अलाहाबादिया याची कठोर शब्दांमध्ये कानउघाडणी करत असतानाच, खंडपीठाने त्याला मोठा दिलासाही दिला आहे. त्याच्या विरोधात सादर करण्यात आलेल्या कोणत्याही तक्रारीच्या संदर्भात त्याला अटक केली जाऊ नये. तथापि त्याने पोलिसांच्या तपासात सहकार्य केले पाहिजे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
केंद्राची कारवाई आवश्यक
केंद्र सरकारने आता युट्यूब किंवा अन्य सोशल मिडिया साईटस् ज्या अशा प्रकारचा अश्लील आशय दाखवितात, त्यांच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. या संबंधी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयासमोर आपली भूमिका प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून स्पष्ट करावी. आम्ही कोणतीही पोकळी सोडू इच्छित नाही. केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट केली नाही, तर आम्हाला विचार करावा लागेल, अशीही स्पष्टोक्ती या प्रकरणात टिप्पणी करताना न्यायालयाने केली आहे.
वकीलांनाही सुनावले
अलाहाबादिया याची बाजू मांडणारे वकील अभिनव चंद्रचूड (निवृत्त सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे पुत्र) यांनाही काही प्रश्न विचारले. आपण अशा प्रकारच्या विधानांचा बचाव करता काय ? या प्रश्नावर आपण व्यक्तीगतरित्या अशा विधानांच्या विरोधात आहोत, असे प्रतिपादन चंद्रचूड यांनी केले. आपल्या पक्षकाराला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. अलाहाबादिया याची जीभ कापणाऱ्यास 5 लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाईल, अशी घोषणा काही लोकांनी केल्याचेही अभिनव चंद्रचूड यांनी निदर्शनास आणून दिले.
मातापित्यांसंदर्भात अश्लील विधान
अलाहाबादिया यांनी इंडिया हॅज गॉट टॅलेंट या कार्यक्रमात मातापित्यांच्या संदर्भात अतिशय अश्लील प्रश्न या कार्यक्रमात भाग घेणाऱ्या एकाला विचारला होता. या प्रश्नावर लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता आणि अलाहाबादिया याला ट्रोल केले होते. त्याच्या विरोधात देशात अनेक स्थानी तक्रारी सादर करण्यात आल्या आहेत. आणखी तक्रारी नोंद करुन घेऊ नयेत, असा आदेश न्यायालयाने दिला असून आता प्रकरण न्यायालयात पोहचले आहे. अलाहाबादिया याने हा प्रश्न एका ऑस्ट्रेलियन कार्यक्रमातून उचलला आहे, हे ही न्यायायलाने त्याच्या निदर्शनास आणून देत त्याची सुनावणीत कानउघाडणी केली आहे.









