महिला-बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या आश्वासनानंतर सचिन पाटील यांचे उपोषण मागे
सांबरा : मुतगे येथील प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघामध्ये झालेल्या गैरकारभाराची सखोल चौकशी करून त्यामध्ये कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर सक्त कारवाई करण्याचे आदेश महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर सचिन पाटील यांनी आमरण उपोषण मागे घेतले. सचिन पाटील यांच्या उपोषणाचा सोमवारी पाचवा दिवस होता. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती. सोमवारी सकाळी श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सहकार खात्याचे जॉईंट रजिस्ट्रार डॉ. सुरेश गौडा यांची भेट घेऊन कृषी पत्तीन संघामध्ये चाललेल्या गैरकारभाराची त्यांना माहिती दिली होती. त्यानंतर शेतकरी आंदोलन करत असल्याचे समजताच महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आंदोलनकर्त्यांची तातडीने भेट घेतली व आंदोलनस्थळी संबंधित अधिकाऱ्यांनाही बोलावून घेतले. यावेळी मंत्री हेब्बाळकर यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले व प्राथमिक कृषी पत्तीन संघाची नि:ष्पक्षपणे सखोल चौकशी करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले व यामध्ये कोणीही दोषी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी सूचनाही केली.
सहकार खात्याचे जॉईंट रजिस्ट्रार डॉ. सुरेश गौडा यांनी सदर संघाची चौकशी करून यामध्ये कोणीही दोषी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची ग्वाही दिली. तसेच सर्व सहकार खात्याचे अधिकारी उपस्थित असताना आंदोलनस्थळी प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाचे सेक्रेटरी अनुपस्थित होते. यावेळी सेक्रेटरी चौकशीला सहकार्य करत नसल्याचे नोंदणी अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. याबाबत मंत्री हेब्बाळकर यांनी पोलिसांना सूचना केल्या आहेत.त्यानंतर युवा शेतकरी सचिन पाटील यांनी आमरण उपोषण मागे घेतले. यावेळी महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर व रमाकांत कोंडुसकर यांनी सचिन पाटील यांना पाणी देऊन त्यांचे आमरण उपोषण सोडविले. यावेळी शेतकऱ्यांनी जय जवान जय किसानच्या घोषणा दिल्या. याप्रसंगी सहकार खात्याचे जिल्हा नोंदणी अधिकारी एम. डी. मनी, सहाय्यक उप नोंदणी अधिकारी पाटील, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुत्र मृणाल हेब्बाळकर, शेतकरी संघटनेचे नेते सिद्धनगौडा मोदगी, रवींद्र पाटील, सीपीआय कल्याणशेट्टी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघामध्ये चाललेल्या गैरकारभाराच्या विरोधात गेल्या पाच दिवसांपासून शेतकऱ्यांनी आंदोलनाचे अस्त्र उगारले होते. त्यामुळे आंदोलनस्थळी मारीहाळ पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. आरोग्य पथकही ठाण मांडून होते. अखेर पाचव्या दिवशी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आंदोलनाची दखल घेतली. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले तर शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शेतकऱ्यांच्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केल्याबद्दल रमाकांत कोंडुसकर यांचेही शेतकरी वर्गातून आभार मानण्यात आले.









