तंबाखूजन्य पदार्थ विक्रीमुळे 550 दुकानदारांना लावला दंड
बेळगाव : जिल्ह्यातील विविध भागात बुधवारी पोलिसांनी शाळेजवळ असलेली पान दुकाने व किराणा दुकानांची तपासणी मोहीम राबविली. तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या 550 दुकानदारांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी बुधवारी सायंकाळी ही माहिती दिली आहे. संपूर्ण जिल्ह्यात पोलिसांनी ही मोहीम राबविली आहे. शिक्षण संस्थांजवळ तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करताना आढळून आलेल्या 550 दुकानदारांवर कारवाई करून 55 हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याचेही पोलीसप्रमुखांनी सांगितले. या मोहिमेसाठी संपूर्ण जिल्ह्यात पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. खासकरून शिक्षण संस्थांपासून जवळ दुकाने थाटून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच पोलिसांनी पुन्हा अशा चुकांची पुनरावृत्ती करू नये, असा इशाराही दिला आहे.









