► वृत्तसंस्था/ कोलंबो
पाकिस्तानची फलंदाज सिद्रा अमिनला आयसीसीने भारताविरुद्धच्या सामन्यावेळी गैरवर्तन केल्याबद्दल कडक समज दिली असून तिच्या खात्यात एक डिमेरिट गुण जमा केला आहे.
भारताविरुद्ध झालेल्या सामन्यावेळी सिद्राने चांगली फलंदाजी केली होती. पण 81 धावांवर बाद झाली तेव्हा निराशेने आपली बॅट जोरात क्रीझवर आपटली होती. याची दखल घेत आयसीसीने तिला कडक शब्दांत समज दिली. ‘महिला विश्वचषक स्पर्धेत भारताविरुद्धच्या सामन्यात गैरवर्तन केल्याने तिला कोड ऑफ कंडक्टच्या लेव्हल 1 अंतर्गत दोषी असल्याचे दिसून आले. याचे स्पष्टीकरण आर्टिकल 2.2 मध्ये देण्यात आले आहे,’ असे आयसीसीने सांगितले. पाकिस्तानच्या डावातील 40 व्या षटकावेळी ही घटना घडली होती. या षटकातील पाचव्या चेंडूवर तिचा झेल हरमनप्रीतने घेतल्यावर ती स्वत:वरच खूप चिडली आणि रागाने आपली बॅट क्रीझवर आपटली होती. या सामन्यात तिने पाकतर्फे एकाकी लढत दिली होती आणि भारताने हा सामना 88 धावांनी जिंकला होता.









