गोडोली प्रतिनिधी
सातारच्या पोवई नाक्यावर हिरवे आमदार स्टिकर लावलेली आणि अंबर दिवा डॅशबोर्डवर ठेवून फिरणाऱ्या फॉरच्युनर गाडी वाहतूक पोलीस योगेश जाधव यांनी अडवली. सदरची गाडी योगेश शंकर गायकवाड यांची स्वतः ची असून त्याने मुंबई येथील एका आमदाराकडे ही गाडी असल्याची बतावणी केली. पोलिसांनी वाहनांची मुळ कागदपत्रे मागितली असता झेरॉक्स प्रती दाखवल्या. सदर इसमाने गाडीवर कारवाई होऊ नये, यासाठी फोनाफोनी करून गाडी घेऊन निघून गेला. दरम्यान सदरच्या गाडीवर अनाधिकृतपणे अंबर दिव्याच्या वापर आणि हिरवे आमदार स्टिकर लावल्यामुळे वाहतूक पोलीस उपनिरीक्षक अभिजित यादव यांनी माहिती घेऊन खात्री करून योग्य ती कारवाई करणार असल्याचे ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
तर जिल्ह्यातील आमदारांच्या गोतावळ्यातील काही जण हिरवे आमदार स्टिकर लावून फिरणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याबाबत १४ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी आमरण उपोषण बसले होते.त्यांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाने वायुवेग पथक अशी वाहने निदर्शनास आल्यास वाहन कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करणार असल्याचे लेखी दिले होते.मात्र जिल्ह्यातील आमदारांच्या दबावापोटी जिल्हा पोलिसांनी ठोस काही कळविले नाही.मात्र पोवई नाक्यावर हिरवे आमदार स्टिकर लावून अंबर दिवा वापरणाऱ्या डमी आमदारांच्या वाहनावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल करणार असल्याचे सुशांत मोरे यांनी सांगितले.









