नदीच्या पात्रात बुडवून ठेवलेल्या दोन होडय़ा, एक सक्शन पंप जप्त
प्रतिनिधी /कुडचडे
बाणसाय, कुडचडे येथे 1 सप्टेंबर रोजी बेकायदा रेती उपसा करणाऱया कामगारांवर गोळीबार झाला होता व त्यात एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर कुडचडे मतदारसंघात बेकायदेशीर रेती उपसावरील बंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येऊन प्रत्येक ठिकाणी 24 तास पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यानंतर शुक्रवारी खांडीवाडा, कुडचडे येथे कॅप्टन ऑफ पोर्ट्सने धडक कारवाई केली व बेकायदेशीर रेती उपसासाठी वापरल्या जाणाऱया सक्शन पंप, होडय़ा यांचा जुवारी नदीच्या पात्रात शोध घेतला.
त्यात मुख्य ठिकाणी पाण्यात बुडवून ठेवलेल्या दोन होडय़ा व एक सक्शन पंप जप्त करण्यात आला आहे. तसेच नदीच्या पात्रात काही अंतरावर शोध घेतल्यावर इतर ठिकाणी 3 सक्शन पंप व एक होडी आढळून आली. ही सामग्रीही लवकरच जप्त करण्यात येणार, अशी माहिती कॅप्टन ऑफ पोर्ट्सचे मरीन निरीक्षक धर्मेंद्र नाईक यांनी दिली आहे. बेकायदेशीर रेती उपसा होत असल्याची माहिती प्राप्त झाल्यावर आम्ही लगेच कारवाई करतो, असे त्यांनी सांगितले.
सदर कारवाई सकाळी 9 पासून संध्याकाळी उशिरापर्यत सुरू होती. यात क्रेनच्या आधारे बुडवून ठेवलेल्या होडय़ा व एक सक्शन पंप वर काढण्यात आला. कुडचडे पोलीस निरीक्षक वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गौतम शेटकर यांनी त्यांना योग्य सहकार्य केले. सदर कारवाईनंतर कुडचडे परिसरात चर्चा सुरू झाली असून कुडचडे मतदारसंघातील बेकायदेशीर रेती उपसावरील बंदी हा फक्त देखावा असल्याच्या प्रतिक्रिया ऐकू येत आहेत.









