भाजप प्रदेशाध्यक्ष तानावडे यांचे मत, आमदार फुटीवर असल्याची चर्चा निरर्थक
प्रतिनिधी/म्हापसा
आज नगर नियोजन मंत्री विश्वजित राणे मायकल लोबो यांच्याबाबत बोलत असल्यास त्यांच्या खात्यात माजी मंत्री मायकल लोबो यांनी बेकायदेशीररित्या कृत्य केले असल्यास त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे या मताचा आपण आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी खोर्ली म्हापसा येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
त्यावेळी ते आमच्या सरकारात असताना त्यांनी चूक केली असेल आणि आता ती मंत्री विश्वजीत राणेना दिसल्यास त्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे. निवडक जणांना टार्गेट करण्यात येते म्हणणे चुकीचे आहे. त्यांची कोणतीच चूक नाही तर तपासणीवेळी काय ते उघड होईल, असे प्रदेशाध्यक्ष तानावडे म्हणाले.
राज्यात सत्तेवर असलेले 25 आमदारांच्या बळावरील भाजपा सरकार भक्कम आहे. त्यामुळे सध्या आमदार फुटीवर असल्याची चर्चा निरर्थक असल्याचे मत व्यक्त करून चर्चेवर पूर्णविराम लावला. एखाद्या आमदाराने थेट केंद्राशी संपर्क साधला असल्यास स्थानिक पातळीवर चर्चा झाल्याशिवाय केंद्राकडून कसलाच निर्णय होत नसतो. आतापर्यंत केंद्राकडून या संबंधीची कसलीच माहिती आपल्याला दिली नसल्याचेही तानावडे यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमावेळी नगरसेवक गैरहजर राहणे चुकीचे
म्हापशातील काही नगरसेवकात असलेल्या नाराजीबाबत बोलताना तानावडे यांनी नाराज नगरसेवकांशी चर्चा करण्यासंबंधी बैठकीचे आयोजन करण्याची सूचना मंडळ अध्यक्ष तसेच नगराध्यक्षांना केली. पक्षातील स्थानिक नेते जेव्हा पक्षाच्या कामापासून स्वतःला दूर ठेवतात त्यावेळी त्यांच्यावर नारीज व्यक्त करणे योग्यच आहे. पंतप्रधानापासून ते आमदार व इतर नेते पक्षाच्या कामासाठी सर्वत्र फिरत असतात. त्यामुळे नगरसेवक त्यांच्या प्रभागात होत असलेल्या कार्यक्रमावेळी गैरहजर राहणे चुकीचे असल्याचे तानावडे म्हणाले.
कारवाई व्हायलाच हवी ः आमदार जोशुआ डिसोझा
विरोधी पक्ष नेते मायकल लोबो यांची दोन हॉटेल्स बेकायदेशीर असतील आणि त्याविरुद्ध नगर नियोजन मंत्र्यांनी कारवाईचे संकेत दिले असल्यास कारवाई होणारच, त्यात आणि बोलायचे काय असा टोला पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांनी मारला. आमदारांनी सदैव कायदेशीर राहायला पाहिजे. त्यांनी बेकायदेशीर कृत्ये करू नये. कायद्यात राहिल्यास कुणाचीच भीती नाही, असे आमदार डिसोझा म्हणाले.
अतिरिक्त जबाबदारीमुळे जीएसआयडीसीचा ताबा नाकारला
भाजपने मला इतरही महत्त्वाच्या जबाबदारी दिल्या आहेत. यामध्ये राष्ट्रीय अल्पसंख्याक मोर्चाचा सरचिटणीस आहे. याशिवाय दोन महिन्यांपासून वारंवार राज्याबाहेर कामानिमित्त जावे लागले. माझ्यावर अतिरिक्त राष्ट्रीय जबाबदारी असल्याने जीएसआयडीसीच्या उपाध्यक्षपदाचा ताबा घेतला नव्हता. मला इतर जबाबदारी मिळणार आहे अशी माहिती मिळाल्याने थोडावेळ थांबलो. असे म्हणत आमदार जोशुआ डिसोझा यांनी जीएसआयडीसीचे उपाध्यक्षपदाचा ताबा न स्वीकारण्याबाबत स्पष्टीकरण दिले.









